
मुंबई : चीनमधल्या एका ५३ वर्षांच्या उद्योजकाने एक अशी कामगिरी केली आहे, जी ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. या पठ्ठ्याने तब्बल ३३ वर्षांत जगभरातील २३३ देश, त्यांचे वेगवेगळे भाग आणि प्रदेश फिरून काढले आहेत. चेन जिनवेई असं या ५३ वर्षीय अवलियाचं नाव आहे. नुकताच तो पेरूची सफर करून आपल्या मूळ गावी, म्हणजे पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील झुजी शहरात परतला आहे. घरी परतल्यावर त्याने एकच मोलाचा संदेश दिला, "वेळ कुणासाठी थांबत नाही." रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये आतापर्यंत फक्त ७० लोकांनीच २३३ देश फिरण्याचा विक्रम केला आहे.
चेन जिनवेई यांची एक मशिनरी कंपनी आहे. आपल्या या जगप्रवासावर त्यांनी तब्बल १० मिलियन युआन म्हणजेच जवळपास साडेबारा कोटी रुपये (US$1.5 million) खर्च केले आहेत.
त्यांच्या या प्रवासाची सुरुवात १९९३ साली झाली. तेव्हा ते सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड गेले होते. त्या काळात इंटरनेट वगैरे फारसं काही नव्हतं. त्यामुळे पुस्तकं किंवा इतरांकडून ऐकलेल्या गोष्टींवर अवलंबून न राहता, 'जगाच्या दुसऱ्या टोकाला काय आहे' हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची त्यांची इच्छा होती.
पण या स्वप्नासाठी त्यांनी आपलं काम किंवा कुटुंब अजिबात बाजूला ठेवलं नाही. उलट, त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातच प्रवासाला जागा दिली. ते अनेकदा एक महिना घरी थांबायचे आणि पुढचा एक महिना परदेशात फिरायला जायचे.
त्यांनी जगातल्या सगळ्यात अवघड ठिकाणी जाण्याचं मुद्दाम ठरवलं होतं, ज्यात ध्रुवीय प्रदेशांचाही (polar regions) समावेश होता.
अंटार्क्टिकाचा प्रवास तर विशेष आव्हानात्मक ठरला. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी पहिला प्रयत्न केला, पण प्रवासाच्या तिसऱ्याच दिवशी त्यांच्या 'ले बोरियल' या फ्रेंच जहाजाची पॉवर गेली आणि त्यातून काळा धूर येऊ लागला. त्यामुळे त्यांना तो प्रवास अर्धवट सोडून परतावे लागले. पण चेन यांनी हार मानली नाही.
फक्त दोन महिन्यांनी, म्हणजे जानेवारी २०१६ मध्ये, ते पुन्हा दुसऱ्या मोहिमेवर निघाले आणि यशस्वीरित्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
त्यांच्यासाठी सर्वात कठीण ठरलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे टोकेलाऊ. हा न्यूझीलंडचा एक दुर्गम बेट प्रदेश आहे.
चेन यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा टोकेलाऊला जाण्याचा प्रयत्न केला. खूप तयारी आणि किचकट प्रक्रिया पार पाडून ते न्यूझीलंडला पोहोचले, पण तिथे अचानक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (public health emergency) जाहीर झाल्यामुळे त्यांची ट्रिप रद्द झाली.
तरीही ते मागे हटले नाहीत. यावर्षी चेन यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि अखेर ते टोकेलाऊच्या त्या दुर्गम बेटांवर पोहोचले. तो क्षण 'अविश्वसनीय आनंदाचा' होता, असं ते सांगतात.
त्यांचा हा ३३ वर्षांचा प्रवास म्हणजे काही आरामदायी सुट्ट्या नव्हत्या. आफ्रिकेत फिरताना त्यांना मलेरिया झाला, तर ग्रीसमध्ये त्यांनी भूकंपाचा अनुभव घेतला. अशी अनेक अनपेक्षित आव्हानं त्यांच्यासमोर आली.पण या अनुभवांमुळे खचून जाण्याऐवजी, शांत राहून मार्ग कसा काढायचा हे शिकल्याचं चेन सांगतात. ते म्हणतात, "जेव्हा एखादी समस्या येते, तेव्हा आधी शांत राहा आणि मग त्यावर उपाय काय याचा विचार करा."
चेन यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं फिरून त्यावर फुली मारणं नव्हतं. त्यांनी प्रत्येक ठिकाणी शक्य तितका जास्त वेळ घालवला, तिथल्या स्थानिक संस्कृतीत मिसळले आणि नेहमीच्या पर्यटन स्थळांच्या पलीकडचं आयुष्य अनुभवलं.
या प्रवासातून त्यांनी एक अनोखा संग्रहही केला. त्यांनी तब्बल १९८ देशांची चलनं (currencies) जमा केली आणि नंतर ती 'झू शियाके मेमोरियल हॉल'ला दान केली. झू शियाके (१५८७-१६४१) हे चीनच्या मिंग राजवटीतील एक प्रसिद्ध भूगोलतज्ज्ञ आणि प्रवासी होते, ज्यांना चीनचे सर्वात पहिले 'ट्रॅव्हल ब्लॉगर' मानले जाते.
चेन यांच्या मते, व्यवसाय चालवणं आणि जग फिरणं या दोन्ही गोष्टींमध्ये लोकांना वाटतं त्यापेक्षा जास्त साम्य आहे. ते म्हणतात, "तुम्ही काहीही करा, त्यात चढ-उतार, सुख-दुःख येणारच, पण तुम्ही फक्त चिकाटीने ते करत राहा."
आणि ज्यांना फिरायचं स्वप्न आहे पण वेळ आणि पैशांमुळे ते पुढे ढकलत आहेत, त्यांच्यासाठी चेन यांचा एक साधा संदेश आहे: “वाट पाहू नका. वेळ कुणासाठी थांबत नाही.” आपला हा अविश्वसनीय प्रवास पूर्ण केल्यानंतर, चेन आता आपल्या मुलांना आणि आई-वडिलांना जास्त वेळ देणार आहेत. तसेच, पर्यटन आणि आउटडोअर इंडस्ट्रीमधील १०० प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव आणि जीवनकथा लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा आहे.