
बीजिंग | प्रतिनिधी चीनमध्ये शासकीय अधिकार्यांच्या खर्चावर चांगलीच कात्री बसणार आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सरकारी अधिकार्यांना दिलासा न देता थेट त्यांच्यावर आर्थिक बंधनं आणली आहेत. आता अधिकार्यांनी चकचकीत जेवणं, महागडी भेटवस्तू, दारू आणि सिगारेट यांपासून लांब राहावं, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ‘राजकीय शिस्त आणि शुद्धता’ या धोरणांवर चालत शी जिनपिंग यांनी सरकारी यंत्रणेमध्ये खोटं भपका आणि खर्चिक सवयींवर लगाम घालायचं ठरवलं आहे.
खर्चाला ‘कट’ लावण्याचा आदेश नवीन आदेशानुसार, अधिकार्यांनी कुठलाही ‘फॉर्मल रिसेप्शन’ करताना महागड्या वस्तू खरेदी करू नयेत, परदेश दौऱ्यांवर अनावश्यक खर्च करू नये आणि सरकारी निधीचा गैरवापर टाळावा, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
जनतेसाठी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न हा निर्णय केवळ खर्च कपातीसाठी नाही, तर सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेसमोर सच्चेपणा आणि काटकसरीचं उदाहरण ठेवावं, यासाठीही आहे. चीनमध्ये याआधी भ्रष्टाचारामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांच्या या नव्या आदेशामध्ये 'शिस्तीचा डोस' पुन्हा अधिक कडक करण्यात आल्याचं मानलं जात आहे.
आर्थिक आव्हानांचा सामना करण्याची तयारी चीन सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून, बेरोजगारी, रिअल इस्टेटमधील संकट आणि जागतिक व्यापारातल्या तणावामुळे सरकारने ‘आधुनिक काटकसरी’चा मार्ग स्वीकारला आहे.