
मुंबई : कॉर्पोरेट नोकरीचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण असह्य झाल्याने, एका ३३ वर्षीय तरुणीने जबरदस्त प्लॅनिंग करून नोकरीला रामराम ठोकला आहे. रिया नावाच्या या तरुणीची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिने नोकरी सोडण्यापूर्वी तब्बल १८ महिने दरमहा ४०,००० रुपयांची बचत करून ७.२ लाख रुपयांचा 'फ्रीडम फंड' (आर्थिक स्वातंत्र्यासाठीचा निधी) तयार केला.
रिया सांगते की, वयाच्या ३० व्या वर्षी कामाच्या प्रचंड ताणामुळे आणि ढासळलेल्या तब्येतीमुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं होतं. याच घटनेने तिला आयुष्यात मोठा निर्णय घेण्यासाठी प्रेरणा दिली. तिने तडकाफडकी नोकरी न सोडता, आधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित केलं आणि मगच कॉर्पोरेट जगातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
बाहेरून जेवण आणि कॉफी मागवणं, तसेच ऑनलाइन ऑर्डर करणं पूर्णपणे बंद केलं. घरच्या जेवणामुळे दर महिन्याला सुमारे २०,००० रुपये वाचले, असा दावा रिया करते. १८ महिन्यांसाठी नवीन कपडे किंवा इतर अनावश्यक वस्तू अजिबात विकत घेतल्या नाहीत. जुन्या वस्तू वापरून तिने दरमहा जवळपास १०,००० रुपये बाजूला ठेवले. मोबाईलमधील ॲप्स आणि स्ट्रीमिंग सेवांची सबस्क्रिप्शन्स रद्द करून दरमहा ५,००० रुपयांची बचत केली. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारे डिनर आणि पार्ट्या टाळल्यामुळे महिन्याला सुमारे ३,००० रुपये वाचले. आठवड्याच्या शेवटी फिरायला जाण्यावर नियंत्रण ठेवून दरमहा अतिरिक्त २,००० रुपये वाचवले.
अनावश्यक खर्च कमी करताना रियाने व्यायाम, आरोग्य, जोडीदारासोबतचा वेळ, सकस आहार आणि घरखर्च यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये कोणतीही तडजोड केली नाही. "आयुष्यात गोष्टी कमी करणे म्हणजे गरिबी नव्हे, तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे ओळखणं आहे," असं रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासोबतच, नोकरी करत असताना तिने पार्ट-टाईम कामातून उत्पन्नाचे काही नवीन मार्गही शोधले होते. १८ व्या महिन्यात जेव्हा तिचं हे पर्यायी उत्पन्न तिच्या १.६ लाख रुपये प्रति महिना पगारापेक्षा जास्त झालं, तेव्हा तिने अधिकृतपणे कंपनीत राजीनामा दिला.
रियाच्या या पोस्टमुळे इन्स्टाग्रामवर मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काही जणांनी तिच्या शिस्तबद्ध आर्थिक नियोजनाचं कौतुक केलं, तर काहींनी सामाजिक आयुष्य आणि मित्र-मैत्रिणींसोबतचे संबंध पूर्णपणे तोडून जगण्याची ही पद्धत व्यावहारिक नसल्याचं मत मांडलं.