
Winter Car Care : हिवाळ्यात तापमान अचानक खाली जाते आणि याचा परिणाम फक्त आरोग्यावरच नाही तर गाड्यांवरही मोठ्या प्रमाणात होतो. अनेक वाहनधारकांना या काळात गाडी स्टार्ट न होणे, वारंवार बंद पडणे किंवा इंजिन खडखड करणे यांसारख्या समस्या भेडसावतात. सहसा या तांत्रिक अडचणी साध्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. थंडीत वाहनांची कार्यक्षमता घटते आणि काही महत्वाच्या पार्ट्सच्या कार्यप्रणालीवर थेट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया गाडी थंडीत बंद पडण्यामागील प्रमुख कारणे आणि त्यावरचे उपाय.
थंडीत गाडी बंद पडण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे बॅटरीची क्षमता कमी होणे. कमी तापमानात बॅटरीमध्ये चार्ज तयार करणाऱ्या केमिकल रिअॅक्शन्स मंदावतात. परिणामी स्टार्ट मोटरला आवश्यक उर्जा मिळत नाही आणि गाडी स्टार्ट होत नाही किंवा चालू असताना बंद पडू शकते. बॅटरी जुनी असल्यास समस्या आणखी वाढते. म्हणूनच हिवाळ्यापूर्वी बॅटरीची हेल्थ तपासणे, टर्मिनल्स स्वच्छ ठेवणे आणि आवश्यक असेल तर बॅटरी बदलणे गरजेचे आहे.
थंड हवामानात इंजिन ऑइल जास्त घट्ट होते. परिणामी इंजिनमध्ये घर्षण वाढते आणि इंजिनला सामान्यपेक्षा अधिक मेहनत करावी लागते. यामुळे गाडी सहज बंद पडते, आवाज येतो किंवा पिकअप कमी होतो. योग्य व्हिस्कोसिटीचे विंटर-ग्रेड इंजिन ऑइल वापरल्यास इंजिन सहज फिरते आणि थंडीतही सुरळीत चालते. हिवाळ्यापूर्वी ऑइल चेंज करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो.
कमी तापमानात डिझेल जास्त घन स्वरूपात बदलते. त्यामुळे फ्युएल लाईन किंवा फिल्टरमध्ये फ्रीझिंग होऊ शकते. पेट्रोल वाहनांमध्ये हा धोका कमी असतो, पण डिझेल वाहनांमध्ये वारंवार बंद पडण्याचे हे एक मोठे कारण आहे. यावर उपाय म्हणून विंटर डिझेल, फ्युएल अॅडिटीव्ह्ज आणि गाडी रात्री उबदार ठिकाणी पार्क करणे यांचा वापर केला जातो.
थंडीत स्पार्क प्लगची क्षमता कमी होते. कार्बन जमा होणे, वायर सैल होणे किंवा ओलावा वाढणे यामुळे स्पार्क कमी निर्माण होतो. इंजिनला पुरेसा स्पार्क न मिळाल्यास गाडी अचानक बंद पडू शकते. स्पार्क प्लगची वेळोवेळी तपासणी व साफसफाई केल्यास ही समस्या टाळता येते.
कमी तापमानात एअर फिल्टरमध्ये ओलावा जमा होऊ शकतो, ज्यामुळे एअर-फ्युएल रेशो बिघडतो. इंजिनला योग्य प्रमाणात हवा न मिळाल्यास गाडी बंद पडते किंवा आयडलिंगमध्ये कंप जाणवतो. स्वच्छ एअर फिल्टर, योग्य ट्यूनिंग आणि नियमित सर्व्हिसिंगमुळे या समस्येपासून बचाव होतो.