
मुंबई : रिपोर्टनुसार, कंपनी जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) फोनवर व्हॉट्सॲप ब्लॉक करण्यासाठी एक नवं सिक्युरिटी फीचर टेस्ट करत आहे. आता फोनचं सॉफ्टवेअर लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट केल्यावरच युजर्सना व्हॉट्सॲप वापरता येईल. सायबर भामटे जुन्या सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा फायदा घेतात. या सायबर हल्ल्यांपासून युजर्सना सुरक्षित ठेवणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार, काही अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सच्या फोनवर एक नवीन वॉर्निंग मेसेज दिसू लागला आहे. व्हॉट्सॲपमध्ये लॉग इन करण्यापूर्वी फोनची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) अपडेट करा, असं या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. युजर्सनी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सध्याचं सॉफ्टवेअर व्हर्जन तपासावं आणि नवीन अपडेट उपलब्ध असल्यास ते इन्स्टॉल करावं, अशा सूचना दिल्या आहेत. हे नवीन अपडेट टाळून युजर्सना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. म्हणजेच, आधी फोनचं सॉफ्टवेअर अपडेट करावं लागेल, त्यानंतरच व्हॉट्सॲप सुरू होईल.
या बदलासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपचं नवीन व्हर्जन वेगळ्याने डाऊनलोड करण्याची गरज नाही. कंपनी सर्व्हरच्या बाजूने हा नवीन नियम लागू करत आहे. सध्या फक्त निवडक अँड्रॉइड आणि आयओएस अकाउंट्सवर याची टेस्टिंग सुरू आहे. पण, नेमक्या कोणत्या सॉफ्टवेअर व्हर्जन्सवर ही बंदी लागू होईल, हे व्हॉट्सॲपने अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जन्समध्ये लेटेस्ट सिक्युरिटी पॅचेस नसतात. त्यामुळे अशा फोनवर सायबर हल्ले होण्याची शक्यता जास्त असते. याच कारणामुळे युजर्सनी नवीन सॉफ्टवेअर व्हर्जनकडे वळावं, यासाठी व्हॉट्सॲप हा नवीन नियम टेस्ट करत असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे, अनधिकृत व्हॉट्सॲप वेब सेवांशी अकाउंट लिंक करणाऱ्या युजर्ससाठीही कंपनी एक नवीन वॉर्निंग टेस्ट करत आहे. व्हॉट्सॲपच्या 'लिंक्ड डिव्हाइसेस' (Linked Devices) सेक्शनमध्ये ही वॉर्निंग दिसू शकते. युजर्सनी फक्त अधिकृत व्हॉट्सॲप सेवाच वापरावी, असं यात सांगितलं जाईल.
अकाउंटची सुरक्षा वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप आणखी काही फीचर्स टेस्ट करत असल्याची माहिती आहे. स्कॅम वॉर्निंग आणि रिस्ट्रिक्टेड चॅट्स यांसारखी फीचर्सही कंपनी डेव्हलप करत आहे. सध्या सॉफ्टवेअर अपडेट केल्याशिवाय व्हॉट्सॲप ब्लॉक करण्याचं फीचर फक्त काही युजर्सपुरतंच मर्यादित आहे. त्यामुळे ज्यांना हा वॉर्निंग मेसेज आलेला नाही, ते नेहमीप्रमाणे व्हॉट्सॲप वापरू शकतात. हा नियम कोणत्या सॉफ्टवेअर व्हर्जन्सना लागू होईल आणि तो सर्वांसाठी कधी रोलआउट होईल, याबाबत व्हॉट्सॲपने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.