घरच्या घरी तांदळापासून हलके आणि कुरकुरीत चुरमुरे सहज बनवता येतात, हे तुम्हाला माहितीये का? आता दुकानातून आणायची गरज नाही. घरीच तांदळापासून चुरमुरे कसे बनवायचे ते पाहुयात.
घरच्या घरी तांदळापासून बनवा कुरकुरीत चुरमुरे!
बाजारातून चुरमुरे आणून भेल, चाट किंवा तिखट चुरमुरे बनवणं खूप सोपं असतं. पण हेच हलके आणि कुरकुरीत चुरमुरे तुम्ही घरीही बनवू शकता, हे तुम्हाला माहितीये का? घरात तांदूळ असतील तर पुरेसं आहे, यासाठी जास्त साहित्याची गरज लागत नाही. योग्य तांदूळ निवडणं आणि ते चांगले वाळवणं या प्रक्रियेत खूप महत्त्वाचं असतं. थोडी काळजी घेतली तर तांदळाचे दाणे छान फुलतात आणि त्याचे मस्त चुरमुरे तयार होतात. चला तर मग, हे कसं बनवायचं ते जाणून घेऊया.
चुरमुरे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
घरी चुरमुरे बनवण्यासाठी प्रामुख्याने तांदूळ, पाणी आणि मीठ लागतं. यासाठी जाड दाण्यांचा उकडा तांदूळ (Parboiled rice) वापरणं सर्वात चांगलं. साधारण २ कप तांदूळ घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. तांदूळ भिजवण्यासाठी आणि नंतर भाजण्यासाठी मिठाचा वापर केला जातो.
तांदूळ भिजवणं ही पहिली महत्त्वाची पायरी
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात थोडं मीठ टाका आणि त्यात तांदूळ साधारण ३० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे तांदूळ मऊ होतात आणि पाणी शोषून घेतात.
यानंतर तांदूळ चाळणीत काढून त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्या. आता एका स्वच्छ सुती कपड्यावर किंवा मोठ्या ताटात तांदूळ पातळ थरात पसरा. तांदळातील ओलावा पूर्णपणे जाईपर्यंत ते उन्हात चांगले वाळवून घ्या.
या टप्प्यावर अजिबात घाई करू नका. तांदळात थोडा जरी ओलावा राहिला, तर ते नीट फुलणार नाहीत. त्यामुळे तांदूळ पूर्णपणे वाळवणं खूप गरजेचं आहे.
मिठामध्ये तांदूळ असे फुलतात!
आता गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवा आणि त्यात साधारण एक वाटी मीठ टाका. मीठ चांगलं गरम होऊ द्या. मीठ एकाच जागी जास्त गरम होऊ नये म्हणून ते अधूनमधून ढवळत राहा.
मीठ चांगलं गरम झाल्यावर त्यात वाळवलेले तांदूळ टाका. आता मोठ्या आचेवर तांदूळ सतत ढवळत राहा. गरम मिठाच्या संपर्कात आल्यावर तांदळाचे दाणे हळूहळू फुलू लागतात.
या वेळी तांदूळ कढईत न ढवळता तसेच सोडून देऊ नका. बहुतांश दाणे फुलून चुरमुऱ्यांसारखे दिसू लागले की गॅस बंद करा.
त्यानंतर कढईतील मिश्रण काळजीपूर्वक एका मोठ्या चाळणीत काढा आणि चाळून घ्या. यामुळे गरम मीठ वेगळं होईल आणि तुम्हाला हलके, कुरकुरीत चुरमुरे मिळतील.
चुरमुरे बनवण्याची दुसरी पद्धत
काही लोक आधी तांदूळ शिजवून मग त्याचे चुरमुरे बनवतात. या पद्धतीत तांदूळ शिजवल्यानंतर ते पूर्णपणे वाळवावे लागतात.
तांदळातील ओलावा पूर्णपणे निघून गेल्यावर, गरम कढईत थोडं तेल टाकून तांदूळ सतत ढवळत भाजले जातात. पण या पद्धतीतही तांदूळ नीट वाळवणं आणि गॅसची आच नियंत्रित ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.
घरच्या चुरमुऱ्यांपासून बनवा अनेक पदार्थ
तयार झालेले चुरमुरे तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीचे मसाले टाकून तिखट चुरमुरे बनवू शकता. कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी आणि शेव टाकली की काही मिनिटांतच चविष्ट भेल तयार होते. मसाला चुरमुरे, तिखट चुरमुरे असे अनेक पदार्थ तुम्ही यातून बनवू शकता.