
Rental Property : भाड्याने घर घेणे दिसायला सोपे वाटले, तरी त्यामागे अनेक कायदेशीर बाबी दडलेल्या असतात. घर मालकाची विश्वासार्हता, कागदपत्रांची शहानिशा, करारातील अटी, डिपॉझिटचे नियम आणि राहणार्याचे हक्क याबाबत योग्य माहिती नसल्यास पुढे मोठे वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भाडेकरार करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या कायदेशीर गोष्टी जाणून घेणे अत्यावश्यक आहे. योग्य माहिती घेतल्यास तुम्ही सुरक्षित, निश्चिंत आणि कायदेशीरदृष्ट्या मजबूत भाड्याने राहू शकता.
भाड्याने घर घेताना सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे भाडेकरार (Rent Agreement). हा करार ११ महिने असतो, कारण त्यापुढील कालावधी सरकारकडे नोंदणीसाठी अनिवार्य असतो. करारात भाड्याची रक्कम, वाढीचा दर, पाणी-वीज बिलाची जबाबदारी, नोटीस पिरियड, मेंटेनन्स कोण देणार, पाहुण्यांवरचे नियम, पार्किंगचे अधिकार इत्यादी सर्व तपशील स्पष्ट दिलेले असणे आवश्यक आहे. करारावर तुम्ही आणि घर मालक दोघांची स्वाक्षरी असावी तसेच दोन साक्षीदारही असणे महत्त्वाचे.
भाडेकरू आणि घर मालक दोघांसाठीही पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. काही शहरांमध्ये ते बंधनकारक केले आहे. घर मालकाने तुमची बेसिक माहिती आणि ओळखपत्र पोलिसांना सादर करावे लागते. त्याचप्रमाणे तुम्हीही घर मालकाची मालकी कागदपत्रे मागून तपासू शकता—उदा. सेल डीड, प्रॉपर्टी टॅक्स रिसीट्स, सोसायटी NOC इत्यादी. मालक खरा आहे का, मालमत्तेवर कोणतेही वाद आहेत का याची माहिती घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतात.
बहुतांश शहरांमध्ये सुरक्षा ठेव (Security Deposit) घेतली जाते. काही ठिकाणी ती २-३ महिन्यांच्या भाड्याइतकी असते, तर मुंबई-पुण्यासारख्या शहरांत ५-६ महिन्यांचा डिपॉझिट रिवाजात आहे. डिपॉझिट घेताना त्याची पावती आणि करारात स्पष्ट उल्लेख असावा. घर सोडताना डिपॉझिट परत कधी, कोणत्या अटींवर दिले जाईल, दुरुस्तीचे पैसे कापले जातील का हे करारात लिहून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर सोसायटीचे बायलॉज आणि नियम विचारून घ्या. अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंग, पाळीव प्राणी, आवाज, पाहुण्यांची ये-जा, फर्निश्ड/अनफर्निश्ड नियम वेगळे असतात. घर मालक कोणता चार्ज भरेल आणि तुम्हाला कोणते मेंटेनन्स द्यावे लागेल हे ठरलेले असावे. नंतर वाद टाळण्यासाठी हे करारातही नमूद करणे चांगले.
बरेचदा सर्वात जास्त वाद नोटीस पिरियडवरून होतात. साधारणपणे १ महिना ते २ महिने नोटीस पिरियड ठेवला जातो. तुम्ही किंवा घरमालक दोघांपैकी कोणीही घर रिकामे करताना हा कालावधी पाळणे आवश्यक असते. अचानक घर रिकामे करण्यास सांगणे, भाडे वाढवणे किंवा डिपॉझिट रोखून धरणे हे सर्व कायदेशीर गुन्हे ठरू शकतात. त्यामुळे नोटीसशी संबंधित सर्व नियम आधीच स्पष्ट असावेत.