
जे लोक अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेची नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा (USCIS) संस्था ग्रीन कार्ड किंवा परमनंट रेसिडेन्सीसाठीच्या अर्जात एक मोठा बदल करणार आहे. पुढच्या महिन्यापासून हा नवीन नियम लागू होईल. संस्थेने स्पष्ट केलंय की, ठराविक तारखेनंतर जुना अर्ज भरल्यास तो थेट रद्द केला जाईल.
## अमेरिकेची नवीन सूचना
USCIS च्या अधिकृत सूचनेनुसार, Form I-485, ज्याला 'Application to Register Permanent Residence or Adjust Status' असंही म्हणतात, त्याची नवीन आवृत्ती १८ सप्टेंबरपासून लागू होईल. अमेरिकेत राहणारे पात्र नागरिक या फॉर्मद्वारेच कायदेशीररित्या स्थायी निवासासाठी किंवा ग्रीन कार्डसाठी अर्ज करतात.
## भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे
या बदलाचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर होणार आहे. कारण नोकरी आणि कुटुंबाच्या निमित्ताने अनेक भारतीय वर्षानुवर्षे ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. स्थलांतरित व्हिसाच्या लांब रांगेत असलेल्या अर्जदारांसाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे.
## तारीख चुकल्यास अर्ज रद्द
USCIS ने सांगितलं आहे की, नवीन फॉर्मची आवृत्ती तारीख 'September 18, 2026' आहे. हा फॉर्म जुन्या 'January 20, 2025' तारखेच्या आवृत्तीची जागा घेईल. अर्जदार आणि वकिलांच्या सोयीसाठी नवीन फॉर्मचा नमुना आणि मार्गदर्शक तत्त्वे आधीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. जुने आणि नवीन अर्ज एकत्र स्वीकारण्यासाठी कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही, असंही संस्थेने स्पष्ट केलंय. याचा अर्थ, अर्जदारांना अर्ज जमा करण्याची तारीख किंवा पोस्टमार्किंगची तारीख काळजीपूर्वक तपासावी लागेल.
USCIS ने स्पष्ट केलंय की १८ सप्टेंबरच्या आधीपर्यंत जुना फॉर्म (January 20, 2025 आवृत्ती) स्वीकारला जाईल. पण जर एखादा अर्ज १८ सप्टेंबर रोजी किंवा त्यानंतर पोस्टाने किंवा ऑनलाइन जमा केला, तर जुना फॉर्म अवैध मानला जाईल आणि तो रद्द होईल.
त्याचप्रमाणे, नवीन फॉर्म (September 18, 2026 आवृत्ती) १८ सप्टेंबरच्या आधी जमा करता येणार नाही. तो फक्त त्या तारखेला किंवा त्यानंतरच स्वीकारला जाईल.
या कडक नियमांमुळे अर्जदारांना तारखेबद्दल किती सतर्क राहावं लागेल हे स्पष्ट होतं. छोट्याशा चुकीमुळे जुना अर्ज जमा केल्यास, तो तपासलाही जाणार नाही, थेट फेटाळला जाईल.
## नियम का बदलले?
USCIS च्या मते, या बदलाचं मुख्य कारण 'पब्लिक चार्ज' (Public Charge) संबंधीचा नवीन नियम आहे. या नियमाद्वारे हे तपासलं जातं की, अर्जदार भविष्यात आपल्या उदरनिर्वाहासाठी अमेरिकन सरकारवर अवलंबून राहू शकतो का. अमेरिकेत वेगवेगळ्या काळात या नियमाच्या अंमलबजावणीत बरेच बदल झाले आहेत आणि हा स्थलांतर धोरणाचा एक वादग्रस्त भाग राहिला आहे.
मात्र, या बदलामुळे फायलिंग फी किंवा अर्ज जमा करण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही, असं USCIS ने स्पष्ट केलं आहे. अर्जदारांना Form I-485 च्या वेबपेजवरून नवीन फॉर्मचा नमुना आणि संपूर्ण सूचना पाहण्यास सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, टेक्नॉलॉजी, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा अनेक क्षेत्रांत काम करणारे भारतीय व्यावसायिक अमेरिकेतील स्थलांतरितांचा एक मोठा भाग आहेत. पण प्रत्येक देशासाठी ठरलेल्या कोट्यामुळे अनेक भारतीयांना ग्रीन कार्डसाठी खूप काळ वाट पाहावी लागते. Form I-485 जमा केल्यानंतर, अर्जदारांना त्यांची स्टेटस ॲडजस्टमेंट प्रक्रिया सुरू असताना काम करण्याची आणि परदेशात प्रवास करण्याची परवानगी मिळते.