
मुंबई : यूपीआय (UPI) पेमेंटवर लावण्यात येणाऱ्या एमडीआर (MDR) चार्जच्या विरोधात २ ऑक्टोबरला 'नो यूपीआय डे' पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपले क्यूआर स्कॅनर (QR scanner) काळ्या कापडाने झाकून निषेध नोंदवला. १५ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर ०.४% एमडीआर चार्ज लागणार आहे. हा चार्ज व्यापाऱ्यांना द्यावा लागणार असला तरी, सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी पाहता लोकांनी आतापासूनच ऑनलाइन पेमेंट करणं टाळायला सुरुवात केल्याचं दिसतंय.
सप्टेंबरमध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या २४ अब्जांच्या पुढे गेली असली तरी, त्यात १.८ टक्क्यांची घट झाली आहे. एनपीसीआय (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये यूपीआयद्वारे २,४५० कोटी व्यवहार झाले होते. सप्टेंबरमध्ये हा आकडा कमी होऊन २,४०७ कोटींवर आला. व्यवहारांच्या रकमेतही १.५० टक्क्यांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये २९.८२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, जे सप्टेंबरमध्ये २९.३७ लाख कोटी रुपयांवर आले आहेत.
आतापर्यंत यूपीआय पेमेंट पूर्णपणे मोफत होतं. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे व्यवहार फ्री ठेवले होते. पण आता यावर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) चार्ज लावला जाणार आहे. सरकारने ही घोषणा केली असून हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलंय, पण अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. १५ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांपेक्षा जास्त यूपीआय पेमेंटवर ०.४% चार्ज लागणार आहे. सरकारने १५ सप्टेंबरला ही घोषणा केली होती आणि अवघ्या दोन आठवड्यांतच त्याचा परिणाम दिसून आलाय.
हा एमडीआर चार्ज सामान्य युजर्सना द्यावा लागणार नाही. सर्वसामान्यांसाठी यूपीआय पूर्वीसारखंच मोफत राहील. पण दुकानदारांनी वस्तूंच्या किमती वाढवून किंवा डिस्काउंट कमी करून हा चार्ज आपल्याकडूनच वसूल केला तर काय, अशी भीती लोकांना वाटतेय. दुसरीकडे, बाजार तज्ज्ञांच्या मते सप्टेंबरमध्ये यूपीआय व्यवहार कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत या महिन्यात एक दिवस कमी असतो. ऑगस्टमध्ये ३१ दिवस होते, तर सप्टेंबरमध्ये ३० दिवस. सप्टेंबरमध्ये रोजच्या यूपीआय व्यवहारांची संख्या ८०२ दशलक्ष होती, जी ऑगस्टमध्ये ७९१ दशलक्ष होती.