
मुंबई : मोबाईलचा वापर फक्त बोलण्यासाठी आणि मेसेज करण्यासाठी करणाऱ्यांसाठी एक भारी बातमी आहे. ज्यांना इंटरनेट डेटाची अजिबात गरज नसते, त्यांच्यासाठी फक्त व्हॉइस कॉल आणि एसएमएस सुविधा असलेले नवीन रिचार्ज प्लॅन्स आणण्याचे आदेश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत.
टेलिकॉम ग्राहक संरक्षण (१३ वी दुरुस्ती) नियम, २०२६ नुसार, टेलिकॉम कंपन्यांना आता ३० दिवसांची व्हॅलिडिटी असलेले स्पेशल व्हॉइस आणि एसएमएस वाउचर्स देणं बंधनकारक असणार आहे. यात डेटा सुविधा नसल्यामुळे याचे दरही कमी असावेत, अशा सूचना ट्रायने दिल्या आहेत. यामुळे जे लोक इंटरनेट वापरत नाहीत, त्यांचे डेटासाठी जाणारे जास्तीचे पैसे वाचतील.
सर्व टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांपेक्षा जास्त व्हॅलिडिटी असलेला किमान एक तरी व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन द्यावाच लागेल. हे प्लॅन्स दर महिन्याला त्याच तारखेला रिन्यू होतील असे असावेत. जर एखाद्या महिन्यात ती तारीख नसेल, तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्लॅन रिन्यू होईल. उदाहरणार्थ, जर एखादा प्लॅन दर महिन्याच्या ३१ तारखेला रिन्यू होणार असेल, आणि त्या महिन्यात ३१ दिवस नसतील, तर तो प्लॅन महिन्याच्या शेवटच्या दिवशी रिन्यू होईल.
सध्या टेलिकॉम कंपन्या जे व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन्स देतात, ते बहुतांश जास्त दिवसांच्या व्हॅलिडिटीचे असतात, याकडे ट्रायने लक्ष वेधले आहे. म्हणजेच हे प्लॅन्स ८०, ८४, ३३६ किंवा ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतात. त्यामुळे ज्यांना कमी दिवसांसाठी रिचार्ज करायचा आहे, त्यांच्याकडे जास्त पर्याय नसतात. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी, त्यांच्या बजेटनुसार कमी कालावधीचा रिचार्ज करण्यासाठी हा नवीन नियम खूप फायदेशीर ठरेल, असं ट्रायचं म्हणणं आहे.
सध्या जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या कंपन्या फक्त व्हॉइस आणि एसएमएस असलेले रिचार्ज प्लॅन्स देतात. जिओचा ३ महिन्यांचा प्लॅन ४४८ रुपयांना, तर वार्षिक प्लॅन १७४८ रुपयांना मिळतो. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे वार्षिक प्लॅन्स १८४९ रुपयांना आहेत. तर त्यांचे ३ महिन्यांचे प्लॅन्स अनुक्रमे ४६९ आणि ४७० रुपयांना मिळतात.
ट्रायच्या या नव्या आदेशामुळे, सध्याच्या लॉंग टर्म प्लॅन्ससोबतच कमी व्हॅलिडिटीचे अनेक नवीन रिचार्ज ऑप्शन्स ग्राहकांना मिळतील. पण, या नवीन प्लॅन्सचे नेमके दर टेलिकॉम कंपन्यांनी अद्याप जाहीर केलेले नाहीत. ज्यांना डेटाची गरज नाही, अशा ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार आणि बजेटनुसार रिचार्ज करण्यासाठी ही नवीन सिस्टीम खूप सोयीची ठरेल, अशी अपेक्षा आहे.