
Toyota Urban Cruiser Ebella : टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतातील बॅटरी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अधिकृतपणे प्रवेश करत आपली ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला सादर केली आहे. भविष्यवेधी तंत्रज्ञान, दमदार एसयूव्ही डिझाइन, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह ईव्ही तंत्रज्ञान आणि उत्तम कामगिरी यांचा मिलाफ असलेली ही नवीन मॉडेल आहे, असे कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तीन दशकांहून अधिक काळ इलेक्ट्रिफाइड वाहन तंत्रज्ञानातील जागतिक अनुभवाच्या आधारावर टोयोटाने ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात आणली आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने टोयोटाच्या मल्टी-पाथ दृष्टिकोनातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
अर्बन क्रूझर एबेला खास विकसित केलेल्या इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कमी गुरुत्वाकर्षण केंद्र आणि सुधारित एअरोडायनॅमिक रचनेमुळे शांत आणि आरामदायक ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. एका चार्जमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास शक्य करणाऱ्या दोन बॅटरी पर्यायांसह ही गाडी येते. वेगवान चार्जिंग सिस्टीम, घरी चार्ज करण्याची सोय आणि प्रवासात वापरता येणारी पोर्टेबल चार्जिंग केबल यामुळे दैनंदिन वापर सोपा होतो.
ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेलामध्ये लिथियम-आयन फॉस्फेट बॅटरी वापरण्यात आली आहे. फ्रंट-व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह ही गाडी स्मूथ ॲक्सिलरेशन देते. ऊर्जा वाचवणारे हीट पंप तंत्रज्ञान आणि थंड हवामानात उत्तम कामगिरी सुनिश्चित करणारी मॅन्युअल बॅटरी प्री-हीटिंग सुविधा यात आहे.
अर्बन क्रूझर एबेला तीन ग्रेडमध्ये उपलब्ध आहे. E1 ग्रेडमध्ये 49 kWh क्षमतेची बॅटरी आणि 106 kW पॉवर मिळते. E2 आणि E3 ग्रेडमध्ये 61 kWh बॅटरी आणि 128 kW पॉवर आहे. सर्व ग्रेडमध्ये 189 Nm टॉर्क निर्माण होतो. एका चार्जमध्ये 543 किमी पर्यंतची उच्च रेंज मिळते.
आठ वर्षांची बॅटरी वॉरंटी, 'बॅटरी-ॲज-ए-सर्व्हिस' पर्याय आणि ३ वर्षांनंतर ६०% पर्यंत रेसिड्यूअल व्हॅल्यूची खात्री देणारा 'अश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम' यांमुळे ग्राहकांना उत्तम मालकी हक्काचा अनुभव मिळतो. या मजबूत 'अश्युअर्ड सर्व्हिस' प्रणालीद्वारे टोयोटा विश्वास, सुरक्षितता आणि मनःशांती देणारा मालकी हक्क अनुभव सुनिश्चित करत आहे.
इलेक्ट्रिक वाहनाचा मालकी हक्क अनुभव आनंददायी बनवण्यासाठी टोयोटाच्या वचनबद्धतेचा 'अश्युअर्ड सर्व्हिस' हा मुख्य आधार आहे. इलेक्ट्रिफाइड तंत्रज्ञानात ३० वर्षांचा अनुभव असलेल्या टोयोटाकडे देशभरात ५०० हून अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स आहेत, जे 'बॉर्न इलेक्ट्रिक व्हेइकल्स'साठी सज्ज आहेत. आधुनिक डायग्नोस्टिक उपकरणे आणि सुधारित पायाभूत सुविधा वापरून जागतिक दर्जाच्या सेवा देण्यासाठी कंपनी तयार आहे. यासाठी, वाहन इलेक्ट्रिफिकेशन क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले २५०० हून अधिक मास्टर टेक्निशियन टोयोटाकडे आहेत. ग्राहकांसाठी 24x7 रोडसाइड असिस्टन्स देखील उपलब्ध आहे. सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये ४५ मिनिटांच्या एक्सप्रेस मेन्टेनन्ससह सोयीस्कर सेवा सुनिश्चित केली जाते.