The Science of Fear: आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण ही भीती नेमकी येते कुठून? मनात तयार होते की मेंदूत? की शरीरात काही बदल होतात? चला, भीतीमागचं विज्ञान समजून घेऊया.
अंधारात चालताना मागे कोणीतरी आहे असं वाटतं. किंवा रक्ताचे डाग, अपघात पाहिल्यावर नकळत अंगावर काटा येतो. हृदयाची धडधड वाढते, श्वास थांबल्यासारखा वाटतो. याच भावनेला भीती म्हणतात. पण या क्षणी आपल्या शरीरात नेमकं काय घडतं?
25
अमिग्डाला: मेंदूतला 'सिक्युरिटी गार्ड'
आपल्या मेंदूत एक अलार्म असतो, ज्याला 'अमिग्डाला' (Amygdala) म्हणतात. एखादं भीतीदायक दृश्य पाहिल्यावर माहिती थेट अमिग्डालापर्यंत पोहोचते. हा आपल्या मेंदूतला एक छोटा 'सिक्युरिटी गार्ड' आहे. धोका ओळखताच तो शरीराच्या इतर भागांना अलर्ट पाठवतो. या प्रतिक्रियेला 'अमिग्डाला हायजॅक' म्हणतात. म्हणजे, आपण विचार करण्याआधीच आपली भीती प्रतिक्रिया देते.
35
शरीरात होणारे बदल
अमिग्डालाने सिग्नल देताच मेंदूतील 'हायपोथॅलॅमस' (Hypothalamus) कामाला लागतो. तो ॲड्रिनल ग्रंथींमधून ॲड्रेनालाईन (Adrenaline) आणि कॉर्टिसोल (Cortisol) हे हार्मोन्स रक्तात सोडतो. यामुळे शरीरात बदल होतात. स्नायूंना जास्त रक्त पुरवण्यासाठी हृदय जोरजोरात धडधडतं. ऑक्सिजन वाढवण्यासाठी श्वास जलद होतो आणि शरीरातील साखर ऊर्जेत बदलते, जेणेकरून शरीर लढायला तयार होतं.
भीती म्हणजे मन आणि मेंदू यांचं मिश्रण आहे. मेंदूतील 'प्रीफ्रंटल कॉर्टेक्स' (Prefrontal Cortex) हा भाग भीतीला ओळखतो. समजा, अंधारात तुम्ही दोरीला साप समजून घाबरलात. तुमचा अमिग्डाला लगेच भीती निर्माण करतो. पण काही क्षणांतच तुमचा मेंदू ओळखतो की ती फक्त दोरी आहे आणि तो अमिग्डालाला शांत करतो. तेव्हा कुठे आपल्याला भीतीतून सुटका झाल्यासारखं वाटतं.
55
भीती नसती तर...
भीती म्हणजे निसर्गाने दिलेलं एकप्रकारचं सुरक्षा कवच आहे. भीती नसती, तर माणूस धोके ओळखू शकला नसता आणि त्याचा जीव धोक्यात आला असता. पण, कोणत्याही कारणाशिवाय वाटणारी भीती, जसं की चिंता (Anxiety) आणि फोबिया (Phobia), ही मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे (chemical imbalance) निर्माण होते.