
मुंबई : तुम्ही जेव्हा एखादा आयफोन (iPhone) हातात घेता, मॅकबुक उघडता किंवा आयपॅड चालू करता, तेव्हा एक ओळखीचं चिन्ह तुमचं लक्ष वेधून घेतं. ते म्हणजे उजव्या बाजूला अर्धवट खाल्लेलं एक साधं सफरचंद. पण जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एका कंपनीने आपली ओळख म्हणून 'खाल्लेलं सफरचंद' का निवडलं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? यामागचं कारण खूपच प्रॅक्टिकल आहे आणि लोकांमध्ये पसरलेल्या अफवांशी त्याचा काहीही संबंध नाही.
अॅपलच्या लोगोचा प्रवास खूप रंजक राहिला आहे. सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या आयझॅक न्यूटनच्या गुंतागुंतीच्या चित्रापासून ते आज जगभरात ओळखल्या जाणाऱ्या साध्या सिम्बॉलपर्यंत हा लोगो बदलत गेला. यामागे ऐनवेळी घेतलेला डिझाईनचा निर्णय, स्टीव्ह जॉब्स यांची एक वेगळीच क्रिएटिव्ह मागणी आणि कॉम्प्युटरच्या भाषेशी अनवधानाने जुळलेला संबंध अशा अनेक गोष्टी आहेत.
आज आपण जो लोगो पाहतो, त्याआधी अॅपलची ओळख पूर्णपणे वेगळी होती. १९७६ मध्ये अॅपल कॉम्प्युटरची स्थापना झाली. स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनियाक यांच्यासोबत कंपनीचे मूळ सहसंस्थापक असलेल्या रोनाल्ड वेन यांनी कंपनीचा पहिला लोगो डिझाईन केला होता.
वेन यांनी बनवलेलं पहिलं डिझाईन हे ब्लॅक अँड व्हाईट होतं. यात सर आयझॅक न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद लटकत आहे, असं चित्र होतं. आजच्या साध्या लोगोपेक्षा हे खूपच वेगळं होतं. या डिझाईनच्या बाजूने एक सुंदर बॉर्डर होती आणि त्यात इंग्रजी कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांच्या कवितेची एक ओळ लिहिली होती.
हे चित्र ज्ञान आणि शोधाचं प्रतीक होतं. पण ते छापायला किंवा इतर ठिकाणी वापरायला खूप अवघड होतं. एका टेक स्टार्टअपला जसा साधा आणि आकर्षक लोगो हवा असतो, तसा तो नव्हता. जेव्हा अॅपल आपला 'अॅपल २' (Apple II) हा कॉम्प्युटर लाँच करण्याच्या तयारीत होती, तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांना कंपनीसाठी एक नवीन ओळख हवी होती. त्यांच्या याच निर्णयामुळे जाहिरात विश्वाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय लोगो तयार झाला.
या लोगोमधील सफरचंदाचा एक तुकडा का गायब आहे, याबद्दल गेल्या अनेक वर्षांत अनेक तर्कवितर्क लावले गेले. काहींच्या मते, याचा संबंध बायबलमधील अॅडम आणि इव्हच्या कथेतील 'फॉरबिडन अॅपल'शी (निषिद्ध फळ) आहे. तर काही लोक याचा संबंध ब्रिटिश गणितज्ञ अॅलन ट्युरिंग यांच्याशी जोडतात. ट्युरिंग यांना आधुनिक कॉम्प्युटरचे जनक मानले जाते आणि १९५४ मध्ये सायनाईडच्या ओव्हरडोजमुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
आणखी एक लोकप्रिय समज असा आहे की, हा 'बाईट' (bite - चावा) म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेतील 'बाईट' (byte - डिजिटल माहितीचे एकक) या शब्दाशी खेळलेला एक शब्दखेळ आहे. पण या लोगोचे डिझायनर रॉब जॅनॉफ यांनी अनेकदा स्पष्ट केलंय की, यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या डिझाईनमागची प्रेरणा नव्हती.
यामागचं खरं कारण खूपच साधं होतं. हे फळ चेरी किंवा इतर कोणत्याही गोल फळासारखं दिसू नये आणि ते सफरचंदच वाटावं, यासाठी त्याला खाल्लेल्या अवस्थेत डिझाईन करण्यात आलं. यामुळे त्या डिझाईनला एक रोजच्या आयुष्यातील फिल मिळाला. सफरचंद खाण्याचा अनुभव जगभरातील सर्वांनाच माहिती असतो. विशेष म्हणजे, कॉम्प्युटरच्या 'बाईट' (byte) या शब्दाशी त्याचा संबंध लोगो पूर्ण झाल्यानंतरच जोडला गेला. सुरुवातीला असा कोणताही विचार नव्हता, तो फक्त एक योगायोग होता.
१९७७ मधील अॅपलचा मूळ लोगो एका रंगाचा नव्हता. त्यात इंद्रधनुष्याच्या रंगांचे सहा आडवे पट्टे होते. हा निर्णय अॅपल लाँच करत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित होता. १९७७ मध्ये आलेला 'अॅपल २' हा कॉम्प्युटर रंगीत डिस्प्ले दाखवू शकत होता आणि हेच त्याचं वेगळेपण होतं. हेच वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा रंगीत लोगो बनवण्यात आला. यामुळे कंपनी इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी दिसू लागली, जे त्यावेळी फक्त पारंपारिक कॉम्प्युटर तंत्रज्ञानावर भर देत होते.
ज्या काळात पर्सनल कॉम्प्युटरबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती, त्या काळात या रंगीत डिझाईनमुळे अॅपलला एक कलात्मक आणि लोकांच्या जवळ जाणारी ओळख मिळाली. जॅनॉफ यांनी सांगितलं की, या रंगांमागे कोणताही छुपा संदेश नव्हता. तो फक्त एक डिझाईनचा भाग होता. पुढची दोन दशकांहून अधिक काळ हा रंगीत लोगोच अॅपलची ओळख राहिला.
हळूहळू या रंगीत पट्ट्यांची जागा एका रंगाने, पारदर्शक आणि मेटॅलिक डिझाईनने घेतली. हा बदल अॅपलच्या उत्पादनांच्या स्वच्छ आणि साध्या लूकवर (clean aesthetics) वाढलेला भर दर्शवत होता. अनेक रंगांवर अवलंबून राहण्यापेक्षा, कंपनीने आपली ओळख निर्माण करण्यासाठी या लोगोच्या आकाराचाच जास्त वापर करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत, उत्पादने आणि ब्रँडिंगच्या गरजेनुसार हा लोगो काळ्या, पांढऱ्या, चंदेरी आणि इतर रंगांमध्ये पाहायला मिळाला आहे.
एक साधं डिझाईन एखाद्या गुंतागुंतीच्या चित्रापेक्षा कसं जास्त प्रभावी ठरू शकतं, याचं अॅपलचा लोगो हे एक उत्तम उदाहरण आहे. यात कंपनीचं नाव नाही, त्यांची उत्पादने काय करतात हे सांगितलेलं नाही किंवा कोणताही मोठा संदेश दिलेला नाही. तरीही हे चिन्ह पाहताच जगातील सर्वात शक्तिशाली टेक कंपनीची आठवण येते.
या लोगोचं यश हा ब्रँडिंगचा एक मोठा धडा आहे. एखादा लोगो लक्षात राहण्यासाठी त्याचा इतिहास गुंतागुंतीचा असण्याची गरज नसते. सफरचंद आणि चेरीमधील फरक ओळखण्यासाठी सुरू झालेली ही साधी युक्ती आज तंत्रज्ञान, डिझाईन आणि क्रिएटिव्हिटीचं जागतिक प्रतीक बनली आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या खाल्लेल्या सफरचंदाचा संबंध ज्ञान, कॉम्प्युटर आणि अॅलन ट्युरिंग यांच्याशी जोडला जातो, ते सुरुवातीला फक्त एकाच साध्या कारणासाठी डिझाईन केलं होतं - ते म्हणजे लोकांनी त्याला सफरचंद म्हणूनच ओळखावं.