EVs : 5 नवीन भन्नाट इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येणार; एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त धावणार

Published : Oct 30, 2026, 04:17 PM IST
EVs : 5 नवीन भन्नाट इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येणार; एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त धावणार

सार

भारतीय ईव्ही मार्केटमध्ये नवीन गाड्यांची लाट येत आहे. टाटा, महिंद्रा, ह्युंदाई आणि होंडा यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या ५ नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात सध्या जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. एकट्या सप्टेंबर २०२६ मध्ये देशात तब्बल ३५,०४८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही ९५.४ टक्क्यांची मोठी वाढ आहे. यामध्ये टाटा मोटर्सने ४२.२ टक्के मार्केट शेअरसह आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. तर महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्ल्यू एमजी मोटर आणि विनफास्ट या कंपन्या त्यांच्या पाठोपाठ आहेत.

लोकांचा ईव्ही गाड्यांकडे वाढणारा कल पाहून मोठ्या कार कंपन्या आता नवीन मॉडेल्स उतरवण्याच्या तयारीत आहेत. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किआ, टाटा, महिंद्रा आणि होंडा या कंपन्या २०२७ च्या पहिल्या सहामाहीत अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ५ प्रमुख इलेक्ट्रिक एसयूव्हीबद्दल जाणून घेऊया.

१. ह्युंदाई आयोनिक पी (Hyundai Ioniq P)

ह्युंदाई कंपनी टाटा पंच ईव्हीला टक्कर देण्यासाठी एक नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आणत आहे. ही गाडी मार्च २०२७ पर्यंत बाजारात येईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या HE1i या कोडनेमने ओळखल्या जाणाऱ्या या गाडीचे नाव 'ह्युंदाई आयोनिक पी' असू शकते, असा दावा रिपोर्टमध्ये केला आहे. ही कार स्टँडर्ड रेंज आणि लाँग रेंज अशा दोन व्हेरियंटमध्ये येईल. ह्युंदाईच्या E-GMP (K) प्लॅटफॉर्मवर तिची निर्मिती केली जाणार असून सुरुवातीच्या टप्प्यात चायनीज कंपनी SVOLT कडून बॅटरी सेल्स घेतले जातील.

२. होंडा अल्फा ० (Honda Alpha 0)

होंडाची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही 'अल्फा ०' चे प्रॉडक्शन व्हर्जन २ डिसेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे सादर केले जाईल. गाडीची संपूर्ण माहिती अजून समोर आली नसली, तरी यात ६५ kWh ते ७५ kWh क्षमतेचे दोन LFP बॅटरी पर्याय मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह सिस्टीम असेल. बाजारात तिची थेट स्पर्धा महिंद्रा BE 6, टाटा हॅरियर ईव्ही, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, टोयोटा एबेला आणि मारुती ई-व्हिटारा यांच्याशी असेल.

३. महिंद्रा व्हिजन एस (Mahindra Vision S)

महिंद्रा डिसेंबर २०२६ मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. या गाडीच्या अधिकृत नावाबाबत कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, महिंद्रा व्हिजन एस या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे प्रॉडक्शन व्हर्जन बाजारात आणले जाईल असे मानले जात आहे. बॉक्सी डिझाइन आणि दमदार लूक असलेली ही गाडी स्कॉर्पिओ फॅमिलीचा भाग असू शकते. कंपनीच्या नवीन NU_IQ प्लॅटफॉर्मवर तिची निर्मिती केली जाईल.

४. टाटा सफारी ईव्ही (Tata Safari EV)

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षीत 'सफारी ईव्ही' आता जानेवारी २०२७ मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. आधी ठरलेली लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. Acti.ev प्लस प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या या एसयूव्हीमध्ये हॅरियर ईव्हीप्रमाणेच ६५ kWh आणि ७५ kWh चे बॅटरी पॅक्स मिळतील. याशिवाय ८० kWh बॅटरीचा पर्यायही दिला जाऊ शकतो. बाजारात महिंद्रा XEV 9e आणि एमजी हेक्टर टोमाहॉक ईव्ही या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल.

५. टाटा अविन्या ईव्ही (Tata Avinya EV)

टाटा मोटर्सच्या प्रीमियम इलेक्ट्रिक व्हेईकल रेंजमधील 'अविन्या' ही पहिली एसयूव्ही पुढील वर्षाच्या सुरुवातीला रस्त्यावर धावताना दिसेल. गेल्या वर्षी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये सादर केलेल्या 'अविन्या एक्स कन्सेप्ट'चे हे प्रॉडक्शन व्हर्जन असणार आहे. ही कार JLR च्या फ्रीलँडर प्लॅटफॉर्मवरून विकसित केलेल्या आर्किटेक्चरवर तयार केली जात आहे. यात ड्युअल मोटर सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. ही गाडी एका चार्जमध्ये ५०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल असा दावा केला जात आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

PhonePe : अवघ्या 11 रुपयांत 25 हजार रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स, फोनपेची जबरदस्त ऑफर
Investment : दरमहा १५ हजार भरून जमा करा ३ कोटी! 'या' सीक्रेट ट्रिकने व्हा श्रीमंत