
Tata Motors : टाटा मोटर्स आता त्यांच्या मोठ्या कार आणि एसयूव्ही मॉडेल्ससाठी सीएनजी तसेच मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनचा गांभीर्याने विचार करत आहे. कंपनीची प्रोपल्शन स्ट्रॅटेजी ही ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या कारपुरती मर्यादित न ठेवता, त्याहून मोठ्या सेगमेंटपर्यंत विस्तारित करण्याची तयारी सुरू आहे. सध्याच्या काळात उद्योग कमी खर्चिक इंधन पर्याय आणि कॅफे ३ अंतर्गत अधिक कडक इंधन कार्यक्षमता निकषांकडे वेगाने वाटचाल करत आहे. अशा वातावरणात टाटाचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे, विशेषत: जेव्हा मारुती सुझुकीने व्हिक्टरिससारख्या मॉडेल्समार्फत प्रीमियम सेगमेंटमध्ये सीएनजीचा विस्तार सुरू केला आहे.
टाटा मोटर्सने पर्यायी इंधन वाहन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वेगाने प्रगती केली आहे. २०२४ या वर्षात कंपनीने १.२ लाखांहून अधिक सीएनजी वाहने विक्री केली असून या वर्षअखेर १.५ लाख युनिट्सचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीला कॉम्पॅक्ट कारच्या पुढे जाऊन मोठ्या सेगमेंटमध्ये सीएनजीचा विस्तार करण्यासाठी मजबूत आधार मिळतो.
टाटा मोटर्सचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा यांनी खुलासा केला की कंपनीने आतापर्यंत ४ मीटरपेक्षा कमी कारमध्ये सीएनजीचा वापर केला आहे. आता ४.३ मीटरपेक्षा मोठ्या विभागावरही ते लक्ष केंद्रित करत आहेत. जर बाजारातील मागणी वाढली, तर टाटा या सेगमेंटमध्येही सीएनजी मॉडेल्स सादर करू शकते. पेट्रोलच्या वाढत्या किमती, डिझेल वाहनांची घटती लोकप्रियता आणि शहरी वाहनचालकांना कमी खर्चिक इंधनाची गरज यामुळे सीएनजीची मागणी सातत्याने वाढत आहे.
टाटा मोटर्सच्या आगामी सिएरा आणि कर्व्ह या एसयूव्ही मॉडेल्समध्ये देखील सीएनजीचा पर्याय देण्याची शक्यता आहे. सीएनजी हा मध्यम व प्रीमियम सेगमेंटच्या ग्राहकांसाठी कमी खर्चिक आणि फायदेशीर पर्याय बनू शकतो.