अनेक कुटुंबांसाठी DMart मध्ये शॉपिंग करणं ही महिन्याची एक सवय झाली आहे. किराणा, घरगुती वस्तू आणि कपडे एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहक इथे गर्दी करतात. त्यातल्या त्यात स्वस्त दर आणि ऑफर्समुळे वीकेंडला तर पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी जायचं हे थोडं नियोजन केलं, तर तासनतास रांगेत उभं राहणं आणि अनावश्यक खरेदी टाळता येते.
25
कधी करावी शॉपिंग?
साधारणपणे शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये DMart सारख्या मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये ग्राहकांची गर्दी जास्त असते. विशेषतः संध्याकाळी, नोकरीवरून परतताना लोक कुटुंबासोबत शॉपिंगला येतात. याउलट, सोमवार ते गुरुवार या दिवसांमध्ये गर्दी कमी असण्याची शक्यता असते. अर्थात, प्रत्येक शहर आणि स्टोअरनुसार गर्दीची वेळ बदलू शकते. त्यामुळे, तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये कोणत्या वेळी गर्दी असते हे काही दिवस पाहिल्यास, तुम्हाला शॉपिंगची योग्य वेळ सहज सापडेल.
35
सकाळच्या वेळेस करू शकता शॉपिंग
गर्दी टाळण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे स्टोअर उघडल्याबरोबर शॉपिंगला जाणं. सकाळच्या वेळी लोकांची वर्दळ कमी असते, त्यामुळे तुम्ही घाई न करता आरामात वस्तू बघून घेऊ शकता. काही स्टोअर्समध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेतही गर्दी तशी कमी असते. संध्याकाळची वेळ तर गर्दीचीच असते, त्यामुळे ज्यांना घाई नाही, त्यांनी ही वेळ टाळावी. पण वीकेंड, सरकारी सुट्ट्या आणि स्पेशल सेलच्या काळात गर्दीचं हे गणित बदलू शकतं.
शॉपिंगचा खर्च नियंत्रणात ठेवायचा असेल, तर स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी 'DMart Ready' ॲपवर वस्तूंच्या किमती तपासणं फायद्याचं ठरतं. यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स आधीच कळतात. काही वस्तूंच्या ऑनलाइन आणि स्टोअरमधील किमतीत फरक असतो, त्यामुळे महत्त्वाच्या वस्तू घेण्यापूर्वी किंमत तपासून पाहा. त्याचबरोबर, 'ऑफर आहे' म्हणून अनावश्यक वस्तू घेणं टाळणंही महत्त्वाचं आहे. यासाठी खरेदी करायच्या वस्तूंची यादी आधीच बनवून नेल्यास मदत होते.
55
अशी करा स्मार्ट शॉपिंग
थोडक्यात, ज्यांना DMart मध्ये शांतपणे आणि नियोजन करून शॉपिंग करायची आहे, त्यांनी आठवड्याचे दिवस आणि सकाळची वेळ निवडावी. पण लक्षात ठेवा की, प्रत्येक स्टोअरमध्ये गर्दीची वेळ किंवा ऑफर्सचे नियम सारखे नसतात. स्टोअरचं ठिकाण, मालाची उपलब्धता आणि स्थानिक ग्राहकांच्या सवयींनुसार परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे, स्टोअरला जाण्यापूर्वी ॲपवर किमती तपासून आणि आवश्यक वस्तूंची यादी घेऊन जाणं उत्तम. विशेषतः 'ऑफर आहे' म्हणून जास्तीच्या वस्तू न घेता, फक्त गरजेच्या वस्तू घेतल्यास तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.