SBI मध्ये तुमचं बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (BSBD) असेल, तर पैसे काढण्याचे नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत. हे नियम फक्त एटीएमपुरते मर्यादित नसून बँकेच्या शाखेतून आणि इतर मार्गांनी पैसे काढतानाही लागू होतात.
SBI च्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी पैसे काढण्याचे काही खास नियम आहेत. या खात्यातून तुम्ही एका महिन्यात पहिले ४ वेळा मोफत पैसे काढू शकता. पण, या ४ वेळेनंतर तुम्ही जितक्या वेळा पैसे काढाल, तेव्हा प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १५ रुपये आणि जीएसटी (GST) आकारला जाईल, असं SBI च्या अधिकृत माहितीत सांगितलं आहे.
26
४ वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येणार
ही ४ वेळा मोफत पैसे काढण्याची मर्यादा SBI एटीएम, इतर बँकांचे एटीएम, बँकेची शाखा आणि ग्राहक सेवा केंद्र (CSP) या सगळ्यांसाठी मिळून आहे. त्यामुळे, जर तुम्ही महिन्यातून अनेकदा थोडे-थोडे पैसे काढत असाल, तर तुम्ही किती वेळा पैसे काढलेत यावर लक्ष ठेवा. 'SBI एटीएममध्ये ४ वेळा आणि इतर एटीएममध्ये ४ वेळा' असा याचा अर्थ होत नाही. सगळ्या मार्गांनी मिळून महिन्यातून फक्त ४ वेळाच मोफत पैसे काढता येतील.
36
BSBD अकाऊंट म्हणजे काय?
हा नियम समजून घेण्यासाठी आधी BSBD अकाऊंट म्हणजे काय ते समजून घेऊया. हे एक बेसिक सेव्हिंग अकाऊंट असतं, ज्यामध्ये बँकेच्या प्राथमिक सुविधा मिळतात. ४ वेळा पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली की प्रत्येक वेळी १५ रुपये + टॅक्स लागतो. पण, पैसे न काढता केलेल्या इतर व्यवहारांसाठी (Non-financial transactions) वेगळे नियम आहेत. जसं की, SBI एटीएम किंवा कॅश डिपॉझिट मशीनवर बॅलन्स चेक करणं यासारख्या गोष्टी मोफत असू शकतात.
एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे सगळेच डिजिटल व्यवहार या ४ मोफत ट्रान्झॅक्शनच्या मर्यादेत येत नाहीत. तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवहार करताय यावर चार्जेस ठरतात. त्यामुळे UPI ने पेमेंट करणं किंवा नेट बँकिंगने पैसे पाठवणं, हे एटीएममधून पैसे काढण्यासारखं धरलं जात नाही. ग्राहकांनी आधी आपलं खातं कोणत्या प्रकारचं आहे ते तपासावं. कारण हा ४ वेळा पैसे काढण्याचा नियम SBI च्या सगळ्या सेव्हिंग अकाऊंट्सना लागू नाही, तो फक्त BSBD खात्यांसाठी आहे.
56
१ ऑक्टोबरपासून नवा नियम
इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. '१ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व SBI ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यावर नवीन चार्जेस लागतील' असा मेसेज सध्या फिरतोय, पण तो तसा घेऊ नका. SBI च्या अधिकृत कागदपत्रांनुसार, BSBD खात्यांसाठी ४ मोफत ट्रान्झॅक्शननंतर १५ रुपये + GST हा नियम आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे हा नियम १ ऑक्टोबरपासून नव्याने लागू होतोय, असं म्हणायला कोणताही अधिकृत आधार नाही.
66
पैसे काढण्याचं नियोजन करा
त्यामुळे, ग्राहकांनी सर्वात आधी आपलं खातं BSBD प्रकारात येतं का, हे तपासून पाहावं. जर तुमचं खातं BSBD असेल, तर महिन्यातून लागणारे पैसे एकदाच काढण्याचं नियोजन करा. यामुळे तुम्हाला विनाकारण लागणारे अतिरिक्त चार्जेस टाळता येतील. याशिवाय, खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झालं, तर त्यासाठी वेगळा नियम आहे. SBI ने BSBD आणि KCC (किसान क्रेडिट कार्ड) खात्यांसाठी 'अपुऱ्या बॅलन्समुळे ट्रान्झॅक्शन फेल' झाल्यास लागणारे चार्जेस आधीच माफ केले आहेत.