
मुंबई : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (EPFO) हा सेव्हिंग करण्याचा महत्त्वाचा पर्याय आहे. कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर कंपनीकडूनही पीएफ मध्ये योगदान दिले जाते. त्यामुळे आपल्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ईपीएफओ पासबुक पोर्टल, उमंग अॅप, एसएमएस आणि मिस्ड कॉल अशा चार सोप्या पद्धतींनी घरबसल्या PF बॅलन्स तपासता येतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
ईपीएफओ अंतर्गत पीएफ खाते सुरू केल्यानंतक प्रत्येक कर्मचाऱ्याला 12 अंकी UAN (Universal Account Number) दिला जातो. हा क्रमांक कर्मचाऱ्यासाठी कायमस्वरूपी असतो. नोकरी बदलली तरी UAN नंबर बदलत नाही. नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतरही पीएफ खात्याशी संबंधित व्यवहार याच युएएन क्रमांकाद्वारे करता येतात. पीएफ खात्यात कर्मचारी आणि कंपनी या दोघांचेही योगदान जमा होते. कर्मचाऱ्याच्या योगदानाची रक्कम साधारणपणे मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्क्यांपर्यंत असते. पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर सरकारकडून दरवर्षी व्याजही दिले जाते.
इंटरनेट किंवा अॅपचा वापर न करता देखील पीएफ खात्यातील रक्कम तपासता येते. यासाठी आपल्या ईपीएफओ खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरून एसएमएस करावा लागेल. मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये EPFOHO UAN असे टाइप करा आणि एसएमएस 7738299899 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर पीएफ खात्याशी संबंधित माहिती एसएमएसच्या मदतीने मिळू शकते.
पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी मिस्ड कॉलची सुविधाही उपलब्ध आहे. ईपीएफओ खात्याशी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर पीएफ खात्याशी संबंधित माहिती एसएमएस द्वारे मिळू शकते.