
नवी दिल्ली : ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे…’ अशी जाहिरात पूर्वी टीव्ही, रेडिओवर लागायची. तर, अलीकडे कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जात होता. विशेष म्हणजे, पूर्वीपासूनच शालेय अभ्यासक्रमात अंडी खाण्याचे सुचवले जाते. स्वास्थ्यवर्धक अंडे अचानक हानिकारक असल्याचे सांगण्यात आले. याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. पण खुद्द सरकारनेच याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
अंड्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत रसायन आढळल्याच्या वृत्तांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, 'काळजी करण्याची गरज नाही' असे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने स्पष्ट केले आहे.
एगोज (Eggos) ब्रँडच्या अंड्यांमध्ये कर्करोगजन्य नायट्रोफ्युरान घटक आढळल्याचे ट्रस्टिफाईड (Trustified) यूट्यूब चॅनलवर सांगण्यात आले होते. यानंतर, FSSAI ने अनेक प्रकारच्या अंड्यांची तपासणी केली आणि म्हटले की, 'हा अहवाल दिशाभूल करणारा आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणारा आहे. या दाव्यांमध्ये कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.'
'2011 च्या अन्न सुरक्षा आणि मानक नियमांनुसार, पोल्ट्री फार्मिंगच्या सर्व टप्प्यांवर नायट्रोफ्युरानच्या वापरावर देशात बंदी आहे. प्रति किलो 1.0 मायक्रो ग्रॅमपर्यंत याचे प्रमाण असल्यास कोणताही धोका नाही. अशी अंडी खाल्ल्याने कर्करोग होत नाही,' असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
'नायट्रोफ्युरान स्वस्त असल्यामुळे कोंबड्यांमधील जिवाणू संसर्ग रोखण्यासाठी ते त्यांना खायला दिले जाते. त्याचा अंश कोंबडीच्या अंड्यांमध्ये मिसळतो आणि ते खाणाऱ्यांच्या शरीरात प्रवेश करतो. यामुळे मानवांना कर्करोग होण्याचा धोका आहे,' असे ट्रस्टिफाईड यूट्यूब चॅनलने म्हटले होते.