
महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एक नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर २०२६ मध्ये ही गाडी बाजारात येण्याची शक्यता आहे. ही गाडी महिंद्रा व्हिजन एस (Vision S) कॉन्सेप्टचं प्रोडक्शन व्हर्जन असेल असा अंदाज आहे. कंपनीने अद्याप या गाडीचं नाव आणि तांत्रिक माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये महिंद्रा व्हिजन एस कॉन्सेप्ट सादर करण्यात आली होती. ही नवीन SUV एका नव्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त इंजिनचे पर्याय मिळतील. पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा हा प्लॅटफॉर्म महिंद्राच्या आगामी गाड्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
समोर आलेल्या टेस्टिंग फोटोंनुसार, कॉन्सेप्ट मॉडेलचा रांगडा लूक आणि उंच बॉडी डिझाईन प्रोडक्शन व्हर्जनमध्येही कायम ठेवली जाईल. गाडीच्या पुढच्या बाजूला तीन आडव्या स्लॅट्स असलेली नवीन सिक्स-स्लॉट ग्रिल, थार रॉक्स (Thar Roxx) सारखे गोल प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, स्पोर्टी बंपर आणि रुंद एअर डॅम पाहायला मिळू शकतो. ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, पॅनोरमिक सनरूफ, रुंद व्हील आर्च आणि बॉडीला लागून असलेले डोअर हँडल्स ही या गाडीच्या बाजूची प्रमुख वैशिष्ट्ये असतील. मागच्या बाजूला उभ्या डिझाईनचे LED टेल लॅम्प्स आणि टेलगेटवर एक सलग LED लाईट स्ट्रिप दिली जाऊ शकते. टेलगेटवर लावलेले स्पेअर व्हील गाडीच्या रांगड्या लूकमध्ये आणखी भर घालेल.
या गाडीच्या प्रोडक्शन व्हर्जनमध्ये प्रॅक्टिकल गोष्टींवर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. यात थार रॉक्ससारखी १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, XUV 7XO कडून प्रेरित असलेले टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि अपडेटेड डॅशबोर्ड मिळू शकतो. याशिवाय ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, मल्टिपल एअरबॅग्ज आणि इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण यांसारखे फीचर्सही मिळण्याची अपेक्षा आहे.
महिंद्राने या नवीन SUV च्या इंजिनबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, यात १.५ लिटर टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय मिळू शकतात. भविष्यात या सिरीजमध्ये पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हर्जनही आणलं जाण्याची शक्यता आहे.
नवीन महिंद्रा व्हिजन एस ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत साधारण १०.५० लाख रुपये असू शकते असा अंदाज आहे. तर याच्या टॉप व्हेरियंटची किंमत १५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र, किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बाजारात आल्यावर या नवीन महिंद्रा मॉडेलची थेट स्पर्धा २०२७ मध्ये येणाऱ्या टाटा स्कार्लेट (Tata Scarlet) आणि रेनॉल्ट ब्रिजर (Renault Bridger) यांसारख्या SUV गाड्यांशी होईल. आकर्षक डिझाईन, आधुनिक फीचर्स आणि इंजिनचे अनेक पर्याय देऊन नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचं महिंद्राचं टार्गेट आहे. गाडीचं अधिकृत नाव, इंजिनचे स्पेसिफिकेशन्स, व्हेरियंट्स आणि किंमत याबद्दल अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.