
मुंबई : 1 ऑगस्टपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. यामुळे तुमच्या खिशावर अधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, युपीआय, घरगुती गॅस सिलिंडर, सीएनजी आणि बँकेसंदर्भातील काही नियम बदलले जाणार आहेत. यामुळे नियम बदलण्यापूर्वी पुढील महिन्याचे बजेट आणि प्लॅनिंग आधीच करुन घ्या. जेणेकरुन आर्थिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल.
क्रेडिट कार्ड संबंधित बदल
क्रेडिट कार्ड संबंघित काही बदल होणार आहेत. तुम्ही एसबीआय कार्ड वापरत असाल तर 11 ऑगस्टपासून काही को-ब्रँडेड कार्डवर मोफत वर्षभरासाठी मिळणारा एक्सीडेंट इन्शुरन्स दिला जाणार नाहीये. आतापर्यंत एसबीआय,यूको बँक, सेंट्रल बँक आणि पीएसबीसह करूर वैश्य बँकांकडून काही खास कार्ड्सवर 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स देऊ केला जात होता. आता ही सुविधा बंद होणार आहे. यामुळे कार्ड धारकांना याचा फटका बसू शकतो.
गॅस सिलिंडरच्या नियमांत बदल
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेप्रमाणे ऑगस्टच्या सुरुवातीलाही तेल कंपन्या सिलिंडरच्या किंमती ठरवणार आहेत. जुलै महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी कपात केली होती. पण घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती तशाच होत्या. आता अशी अपेक्षा आहे की, 1 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती देखील कमी होऊ शकतात.
युपीआय पेमेंट संदर्भातील नियम
युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांसाठी नवे नियम लागू होणार आहेत. तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे वापरत असाल तर भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने काही मर्यादा ठरवल्या आहेत. आतापर्यंत दिवसभरात 50 वेळा खात्यातील शिल्लक रक्कम तपासून पाहू शकता. याशिवाय मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या खात्यांबद्दल 25 वेळा माहिती मिळवू शकता.
ऑटोपे ट्रांजेक्शनसाठी दिवसातील तीन वेळांचा स्लॉट उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुसरा दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आणि तिसरा स्लॉट रात्री 9.30 नंतरचा असणार आहे. पेंमेंटचे ट्रांजेक्शन झाले नसल्यास त्याचे स्टेटस दिवसातून तीनदा बघता येणार आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत बदल
एप्रिल 2025 नंतर याच्या किंमतीत बदल झालेला नाही. ज्यावेळी मुंबईत सीएनजी 79.50 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 49 रुपये प्रति युनिट होती. आता 1 ऑगस्टपासून किंमती बदलण्याची शक्यता आहे.
बँक हॉलिडे
ऑगस्ट महिन्यात बँक हॉलिडे किती असणार याची लिस्ट आली आहे. आरबीआयकडून प्रत्येक महिन्यातील सण आणि महत्वाच्या तारखांच्या आधारवर सुट्ट्या ठरवल्या जातात. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार असतात. ऑगस्ट महिन्यात 16 दिवस बँक हॉलिडे असणार आहे.