
उन्हाळा आला की कडक ऊन, घाम आणि चिकचिक हैराण करून सोडते. अशा वातावरणात प्रत्येकाला वाटतं की आपलं शरीर दिवसभर थंड आणि फ्रेश राहावं. आंघोळ करणं ही आपली रोजची सवय आहे, पण याच आंघोळीच्या पाण्यात काही खास नैसर्गिक गोष्टी मिसळल्या, तर ही साधी गोष्टही शरीराला थंडावा आणि आराम देऊ शकते. आयुर्वेद आणि घरगुती उपायांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या शरीराला आतून थंडावा देण्यासोबतच त्वचेलाही निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे, या सर्व गोष्टी घरात सहज मिळतात आणि त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. जर तुम्हालाही या उन्हाळ्यात स्वतःला थंड, ताजेतवाने आणि उत्साही ठेवायचं असेल, तर आंघोळीच्या पाण्यात या गोष्टी नक्की मिसळा.
आंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी मिसळल्यास शरीराला लगेच थंडावा जाणवतो. त्याचा सुगंध मूड फ्रेश करतो आणि त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतो. उन्हाळ्यातील हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो.
लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे घामाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. पाण्यात थोडा लिंबाचा रस पिळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीर स्वच्छ आणि ताजेतवाने वाटतं.
त्वचेसाठी कडुलिंब खूप फायदेशीर मानला जातो. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास खाज, घामोळ्या आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून आराम मिळतो.
पुदिना शरीराला थंडावा देण्यासाठी खूप प्रभावी आहे. पुदिन्याच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेला कूलिंग इफेक्ट मिळतो आणि दिवसभराचा थकवाही दूर होतो.
चंदन त्वचेला थंडावा आणि चमक देण्यासाठी ओळखले जाते. आंघोळीच्या पाण्यात चंदन पावडर मिसळल्यास शरीराला आराम मिळतो आणि दिवसभर ताजेपणा टिकून राहतो.