
Mumbai Taxi Driver : आजकाल सगळीकडे डिजिटल पेमेंटचाच जमाना आहे. टॅक्सीमध्येही आता बहुतेक ठिकाणी QR कोड दिसतात. प्रवास पूर्ण झाल्यावर तो स्कॅन करून पैसे दिले जातात. पण, मुंबईतील एका तरुणीला टॅक्सीमध्ये दिसलेल्या QR कोडचा एक वेगळाच अनुभव आला. तिने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबईच्या या क्रिएटिव्ह संस्कृतीचा मला खूप अभिमान वाटतो, असं ती तरुणी म्हणाली.
घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना ती तरुणी म्हणाली, ती एका लोकल काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये बसली होती. पुढच्या सीटवर एक QR कोड लावलेला तिला दिसला. सगळ्यांप्रमाणेच तिलाही तो पेमेंटसाठीचा कोड वाटला. QR कोड पाहून तिला आश्चर्य वाटले आणि तिने ड्रायव्हरला त्याबद्दल विचारले. तेव्हा ड्रायव्हरने सांगितले की तो पेमेंटसाठीचा कोड नसून त्याच्या मुलाच्या युट्यूब चॅनलचा आहे. त्याचा मुलगा रॅप म्युझिक करतो आणि हे त्याचंच युट्यूब चॅनल आहे, असं ड्रायव्हर म्हणाला.
दिव्युषी सिन्हा नावाच्या तरुणीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही कल्पना खूपच छान असल्याचे दिव्युषीचे मत आहे. तिने QR कोड आणि त्यासोबत असलेल्या नोटचा फोटोही शेअर केला आहे. त्यात लिहिले आहे, 'हॅलो, मी राज, या टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे. कृपया स्कॅन करा, हे माझे युट्यूब चॅनल आहे. मी त्यावर रॅप म्युझिक शेअर करतो. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हे आवडेल अशी आशा आहे, धन्यवाद.'
ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. ही एक अतिशय क्रिएटिव्ह कल्पना असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.