
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 181 हा महिला हेल्पलाईन क्रमांक जारी करत, लाडक्या बहिणींनी आवश्यकता असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
e-KYC प्रक्रिया करताना काही महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींसह योजनेशी संबंधित इतर सर्व शंका फोनद्वारे सोडवण्यासाठी 181 या हेल्पलाईनवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कॉल ऑपरेटर्सना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे आदिती तटकरेंनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित e-KYC, लाभ थांबणे, पात्रता, कागदपत्रे आणि हप्त्यांबाबतच्या तक्रारींचे निरसन थेट फोन कॉलद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज भासणार नाही.
e-KYC करताना झालेल्या चुका लक्षात घेता, योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार असून, यामुळे पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2025 चा 1500 रुपयांचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांत लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरून आक्रोश केल्याचे चित्र दिसून आले होते.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याचा लाभ डिसेंबरच्या अखेरीस व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात आला. तर, डिसेंबर महिन्याचा लाभ 14 जानेवारीच्या सुमारास लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.