
LPG Overcharge Complaint: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतात घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरची किंमत ₹913 (दिल्ली) पर्यंत पोहोचली आहे. या महागाईच्या काळात अनेक ठिकाणी गॅस एजन्सीचे लोक किंवा डिलिव्हरी बॉय ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे उकळू शकतात. जर तुमचा गॅसवाला सुद्धा तुमच्याकडून ठरलेल्या किमतीपेक्षा एक रुपयाही जास्त मागत असेल, तर शांत बसू नका. सरकारने यासाठी कडक नियम बनवले आहेत. तुम्ही फक्त एका फोन कॉल किंवा मेसेजद्वारे तुमची तक्रार नोंदवू शकता आणि त्यावर त्वरित कारवाई होईल. चला जाणून घेऊया, कुठे आणि कशी तक्रार करायची...
युद्धामुळे फक्त गॅस सिलेंडर महागच नाही, तर त्याच्या पुरवठ्याचं संकटही वाढलं आहे. सरकारने आता एका सिलेंडरनंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी 25 दिवसांचा वेटिंग पीरियड अनिवार्य केला आहे. घाबरून होणारी बुकिंग आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत काही एजन्सी किंवा डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागू शकतात.
अनेकदा डिलिव्हरी बॉय 'टीप' किंवा 'डिलिव्हरी चार्ज'च्या नावाखाली ₹20 ते ₹50 जास्त मागतात. नियमानुसार, तुमच्या गॅस बिलावर (Invoice) जी किंमत लिहिलेली आहे, तुम्हाला फक्त तेवढेच पैसे द्यायचे आहेत. कारण बिलामध्ये डिलिव्हरी चार्ज आधीच जोडलेला असतो.
1. टोल-फ्री हेल्पलाइन (1906)
हा संपूर्ण भारतासाठी एक कॉमन इमर्जन्सी आणि तक्रार क्रमांक आहे. तुम्ही कधीही यावर कॉल करून तुमच्या गॅस एजन्सीविरोधात ओव्हरचार्जिंगची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय इतर कोणत्याही समस्येची किंवा मनमानी कारभाराची तक्रार करू शकता. ही ऑल इंडिया ऑफिशियल एलपीजी हेल्पलाइन आहे. इथे तुम्ही थेट तक्रार करू शकता. यासाठी एजन्सीचे नाव, डिलिव्हरीची तारीख, किती जास्त पैसे घेतले आणि मोबाईल नंबरची गरज पडते. ही तक्रार थेट ऑईल कंपनीपर्यंत पोहोचते.
2. ऑफिशियल कस्टमर केअर नंबर
Indane (इंडियन ऑइल) - 1800-233-3555
HP Gas (हिंदुस्तान पेट्रोलियम) - 1800-2333-555
Bharat Gas (भारत पेट्रोलियम) - 1800-22-4344
3. स्थानिक अन्न आणि नागरी पुरवठा कार्यालय
जर एजन्सी स्थानिक पातळीवर खूप त्रास देत असेल, तर तालुका पुरवठा कार्यालय किंवा जिल्हा अन्न पुरवठा कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिल्यास एजन्सीची चौकशी होऊ शकते.
4. ॲप किंवा वेबसाईट
याशिवाय, 'My LPG' ॲप किंवा mylpg.in या वेबसाईटवर जाऊनही ऑनलाइन तक्रार करता येते. इथे तुम्ही लेखी तक्रार करू शकता. यासाठी एजन्सी निवडून पुरावा अपलोड करा, त्यानंतर तुम्हाला तक्रार क्रमांक मिळेल. या सर्व तक्रारी ट्रॅक केल्या जातात आणि एजन्सीला त्यावर उत्तर द्यावं लागतं.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. येथे दिलेला ₹913 चा दर फक्त दिल्लीतील घरगुती गॅसचा आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये स्थानिक करांमुळे LPG च्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. बुकिंगचे नियम आणि ताज्या किमतींसाठी तुमच्या गॅस वितरकाशी (Distributor) किंवा तेल कंपनीच्या (IOCL, HPCL, BPCL) अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या. तक्रार नोंदवण्यापूर्वी तुमच्याकडे वैध बिल आणि ग्राहक आयडी (Consumer ID) नक्की ठेवा. हा लेख कोणत्याही विशिष्ट गॅस एजन्सीवर आरोप करत नाही, तर वाचकांना त्यांच्या ग्राहक हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी लिहिला आहे.