
Induction Buying Tips LPG Crisis: देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा झाल्याची बातमी आली आणि लोकांची धावपळ उडाली. मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत आच पोहोचली आहे. गॅस सिलेंडरच्या लांब रांगांमध्ये उभं राहण्यापेक्षा अनेकजण आता इंडक्शन कुकटॉप (Induction Cooktop) खरेदी करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, ॲमेझॉनवर १०० पैकी ७० कंपन्यांचा स्टॉक संपलाय आणि फक्त ४ दिवसांत तब्बल ५ लाख इंडक्शन विकले गेले आहेत. तुम्हीही इंडक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर थांबा. घाईगडबडीत आणि पॅनिक होऊन तुम्ही कष्टाचे पैसे चुकीच्या किंवा खराब मशीनवर वाया घालवू शकता. मागणी वाढल्यामुळे दुकानदारांनी किमती २० टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत, इंडक्शन खरेदी करण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की तपासा.
इंडक्शन १३०० रुपयांपासून ते ४५०० रुपयांपर्यंत मिळतात. पण स्वस्तात मिळतोय म्हणून कमी वॅटचा (उदा. 1200W किंवा 1400W) इंडक्शन घेऊ नका. कमीत कमी 2000 वॅट (Watts) असलेला मॉडेल निवडा. यामुळे स्वयंपाक लवकर होतो आणि वीजही कमी लागते. कमी वॅटच्या मशीनवर डाळ शिजायला तासनतास लागतील. 1200W पर्यंतचा इंडक्शन छोट्या कामांसाठी, 1800W रोजच्या स्वयंपाकासाठी आणि 2000 पेक्षा जास्त वॅटचा इंडक्शन जलद स्वयंपाकासाठी उत्तम असतो.
आजकाल बाजारात अनेक बनावट आणि स्वस्त ब्रँड्स आले आहेत. यांच्या आतमध्ये ॲल्युमिनियमची कॉइल असते, जी लवकर जळते. त्यामुळे नेहमी 100% कॉपर कॉइल (Copper Coil) असलेलाच इंडक्शन घ्या. तो जास्त काळ टिकतो आणि लोड वाढल्यावरही खराब होत नाही.
गॅसच्या तुटवड्यामुळे आता विजेच्या ग्रीडवर लोड वाढला आहे. त्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त होणं सामान्य आहे. म्हणून, इंडक्शन घेताना त्यात व्होल्टेजच्या चढ-उतारापासून (Voltage Fluctuation) बचावासाठी सेफ्टी सेन्सर आहे की नाही, हे तपासा. तसेच, भांडं उचलल्यावर मशीन आपोआप बंद व्हायला हवी. यामुळे वीज आणि तुमचा जीव, दोन्ही वाचतात.
इंडक्शनवरची काळी काच (Ceramic-Glass) जर हलक्या प्रतीची असेल, तर जड प्रेशर कुकर ठेवताच ती तडकू शकते. त्यामुळे प्रीमियम किंवा मध्यम रेंजचा (₹2000-₹3500) मॉडेल निवडा. हे १०-१५ किलोपर्यंत वजन सहज पेलू शकतात. ब्रँड नसलेल्या स्वस्त काचेपासून दूर राहा. इंडक्शनवर सर्व प्रकारची भांडी चालत नाहीत. ज्या भांड्यांचा तळ मॅग्नेटिक (लोखंडासारखा) असतो, तीच भांडी यावर चालतात. त्यामुळे स्टील, कास्ट आयर्नसारखी भांडी त्यावर चालतील की नाही, हे खरेदी करण्यापूर्वी नक्की विचारा.
ऑनलाइन सेलमध्ये अनेक अशा कंपन्या दिसत आहेत, ज्यांची नावंही कालपर्यंत कुणी ऐकलेली नव्हती. स्टॉक संपत असल्याचा फायदा घेऊन त्या काहीही विकत आहेत. त्यामुळे ISI मार्क नसलेला इंडक्शन म्हणजे एक प्रकारे 'टाईम बॉम्ब' असू शकतो. पक्कं बिल घ्या आणि कमीत कमी १ वर्षाची होम सर्व्हिस वॉरंटी देणाराच ब्रँड निवडा.