Kitchen Hack: आपण बाजारातून आणलेल्या भाज्या फक्त एकदा पाण्याने धुवून वापरतो. पण, असं करणं खरंच सुरक्षित आहे का? तज्ज्ञांच्या मते, आपली ही पद्धत चुकीची असू शकते. मग भाज्या धुण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया.
आपल्याला वाटतं की भाज्या एकदा पाण्याने धुतल्या की झालं. पण पिकांवर फवारलेली कीटकनाशकं, माती आणि सूक्ष्मजंतू त्यांच्या पृष्ठभागावर असू शकतात. घरात बसून सर्व रसायनं पूर्णपणे काढून टाकणं शक्य नसलं तरी, योग्य पद्धतीनं भाज्या धुतल्यास वरची घाण नक्कीच कमी करता येते.
25
भाज्या स्वच्छ करण्यासाठी सोपी युक्ती
यावर एक सोपा आणि घरात सहज उपलब्ध होणारा उपाय म्हणजे मिठाचं पाणी. योग्य प्रमाणात आणि वेळेनुसार याचा वापर केल्यास भाज्यांची चव न बदलता त्या अधिक स्वच्छ होतात. मिठाचं पाणी हायपरटोनिक द्रावण म्हणून काम करतं. यामुळे भाजीच्या पृष्ठभागावरील धूळ, माती आणि लहान किडे निघून जातात. तसेच, काही प्रमाणात कीटकनाशकांचे अंशही कमी होतात. पण, भाजीच्या आत गेलेली रसायनं यामुळे निघत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात.
35
मिठाच्या पाण्याने भाज्या ताज्या राहतात
एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात प्रत्येक लिटर पाण्यामागे 1-2 चमचे मीठ घाला. मीठ पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा. आधी भाज्या साध्या पाण्याने धुवा, म्हणजे वरची माती निघून जाईल. नंतर या मिठाच्या पाण्यात भाज्या 10-15 मिनिटं भिजवून ठेवा. पालेभाज्या असतील तर त्यांची पानं मोकळी करून पाण्यात बुडवा.
बटाटा, काकडी, वांगी यांसारख्या कडक भाज्या हाताने हळूवारपणे चोळा. मिठाच्या पाण्यातून काढल्यावर त्या पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. उरलेलं मीठ आणि घाण काढून टाकण्यासाठी हे आवश्यक आहे. यानंतर, भाज्या एका चाळणीत काढून पाणी निथळू द्या. गरज वाटल्यास कापडाने पुसून घ्या. सुकलेल्या भाज्या जास्त काळ ताज्या राहतात.
55
पालेभाज्यांच्या बाबतीत काळजी घ्या
ही पद्धत पालक, मेथी, लेट्यूस यांसारख्या पालेभाज्या आणि कोबी, फ्लॉवर, काकडी, वांगी, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांसाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवा, मिठाच्या पाण्याने फक्त वरवरची कीटकनाशकं कमी होतात, आत गेलेली नाही. भाज्या जास्त वेळ भिजवू नका, विशेषतः मऊ पालेभाज्या खराब होऊ शकतात. मिठाच्या पाण्यातून काढल्यावर भाज्या थेट शिजवू नका, त्या पुन्हा धुणे आवश्यक आहे.