जयपूरचे उद्योजक शिव जोहरी यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी २५ लाख रुपये खर्च करून पूर्णपणे चांदीची एक खास पत्रिका तयार केली आहे. सुमारे ३ किलो वजनाच्या या पेटीसारख्या पत्रिकेत ६५ देवतांच्या कोरीव कामासह अनेक वैशिष्ट्ये आहेत.
काही लग्नपत्रिका त्यांच्या थाटामाटामुळे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. अनेकजण पत्रिकेतूनच आपली श्रीमंती आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षांपूर्वी माजी मंत्री आणि आमदार गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका खूप चर्चेत होती. आताही राजस्थानच्या जयपूरमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेली पत्रिका खूप व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका कोणत्याही मास्टरपीसपेक्षा कमी नाही. उद्योजक शिव जोहरी यांनी आपल्या मुलीच्या पाठवणीला केवळ एक पारंपरिक विधी न मानता, त्याला श्रद्धा, परंपरा आणि भावनांचा उत्सव बनवण्याचा निर्णय घेतला.
24
पूर्णपणे चांदीपासून बनवलेली लग्नपत्रिका
होय, जयपूरचे उद्योजक शिव जोहरी यांनी पूर्णपणे शुद्ध चांदीची पेटीच्या आकाराची लग्नपत्रिका तयार केली आहे. तिचे वजन सुमारे तीन किलोग्रॅम असून, त्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च आला आहे. सुमारे ८ x ६.५ इंच आणि ३ इंच खोल असलेली ही पत्रिका आता शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. ही पत्रिका जोहरी यांनी आपल्या होणाऱ्या सुनेच्या आईला दिली आणि प्रतिकात्मकरित्या सांगितले की, मी फक्त माझ्या मुलीला तुमच्या घरी पाठवत नाही, तर तिचे भविष्य दैवी संरक्षणात सोपवत आहे. शिव जोहरी म्हणाले, 'माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला फक्त नातेवाईकांनाच नाही, तर सर्व देवी-देवतांना आमंत्रित करायचे आहे. नवीन जोडप्याला आयुष्यभर सुखी राहण्याचा आशीर्वाद मिळो, अशी माझी इच्छा आहे.'
34
३ किलो वजनाची २५ लाखांची चांदीची लग्नपत्रिका
या पत्रिकेवर ६५ देवतांचे तपशीलवार कोरीव काम आहे, जे खूप विचारपूर्वक तयार केले आहे. सर्वात वर गणपती, एका बाजूला पार्वती देवी आणि दुसऱ्या बाजूला शिव आहेत. त्यांच्या खाली लक्ष्मी आणि विष्णू आहेत. त्यानंतर तिरुपती बालाजीची दोन रूपे आणि त्यांचे द्वारपाल आहेत. या डिझाइनमध्ये पंखे आणि दिवे घेतलेल्या देवता, तसेच शंख आणि ढोल वाजवणाऱ्या देवतांचाही समावेश आहे. पत्रिकेच्या मध्यभागी वधू श्रुती जोहरी आणि वर हर्ष सोनी यांची नावे काव्यात्मक शैलीत कोरलेली आहेत. हत्ती त्यांच्या नावाभोवती फुले उधळत आहेत, जे समृद्धी आणि शुभ सुरुवातीचे प्रतीक आहे. पत्रिकेच्या बाहेरील बाजूस अष्टलक्ष्मी आणि तिचे सेवक आहेत. तसेच, मागील बाजूस तिरुपती बालाजीवर प्रकाश टाकणाऱ्या सूर्यदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पत्रिकेच्या आत दोन्ही कुटुंबांची नावेही कोरलेली आहेत, ज्यामुळे ही पत्रिका केवळ एका कार्यक्रमाची आठवण न राहता, संपूर्ण कुटुंबाच्या भावना आणि परंपरेचा दस्तऐवज बनते.
डिझाइनचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते बालपणापर्यंतच्या जीवनाचे चित्रण. दक्षिण भारतीय शैलीतील चित्रणात कृष्णाला एक मुख आणि पाच शरीरं दाखवली आहेत, ज्याच्याभोवती आठ गायी भक्तिभावाने पाहत आहेत. पत्रिकेच्या कडेला विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पत्रिका एकही खिळा किंवा स्क्रू न वापरता चांदीच्या १२८ तुकड्यांनी जोडलेली आहे. या पत्रिकेची संकल्पना आणि डिझाइन तयार करण्यासाठी जोहरी यांना सुमारे एक वर्ष लागले. प्रत्येक तपशील आपल्या मुलीवरील भक्ती आणि प्रेम दर्शवतो, असे ते म्हणाले.
सोशल मीडिया वापरकर्ते या खास पत्रिकेला 'कलाकृती', 'वडिलांचे प्रेम' आणि 'अतिशय अर्थपूर्ण लग्नपत्रिका' असे म्हणत आहेत. ही पत्रिका भारतीय विवाह, श्रद्धा आणि भावनांचे अद्भुत प्रदर्शन करते, असे अनेकांनी म्हटले आहे.