
ISRO Appointments भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) सध्या मोठे प्रशासकीय फेरबदल पाहायला मिळत आहेत. इस्रोच्या तिरुवनंतपुरममधील दोन सर्वात महत्त्वाच्या केंद्रांना अखेर स्थायी संचालक (Permanent Directors) मिळाले आहेत. इस्रोचे मुख्य केंद्र असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (VSSC) प्रमुखपदी डॉ. यू. पी. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, वलियमला येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरची (LPSC) धुरा आता एन. जयन यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून हे दोघेही या पदांचा तात्पुरता कार्यभार सांभाळत होते. आता २५ जून रोजी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे आधीचे प्रमुख ए. राजराजन हे मे महिन्याच्या अखेरीस निवृत्त झाले होते. तर LPSC चे संचालक एम. मोहन हे एप्रिल महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले होते.
याशिवाय, तिरुवनंतपुरममधील इस्रो इनर्शियल सिस्टिम्स युनिट (IISU) आणि महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्येही (IPRC) लवकरच नेतृत्व बदल होणार आहेत. IISU चे प्रमुख एल. सौम्यनारायणन ३० जून रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी सध्याचे असोसिएट डायरेक्टर जोजी जे. चामन पदभार स्वीकारतील. IPRC मध्ये, जे. असीर पाक्किराज ३० जून रोजी निवृत्त झाल्यावर नारायणन अप्पू नवीन प्रमुख म्हणून जबाबदारी घेतील. नारायणन अप्पू सध्या बांधकाम सुरू असलेल्या इंटिग्रेटेड क्रायोजेनिक इंजिन टेस्ट फॅसिलिटीचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत आणि पुढील आदेशापर्यंत ते ही जबाबदारीही सांभाळणार आहेत. बंगळूरूमधील उपग्रह विकास केंद्र असलेल्या यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्येही पुढील महिन्याच्या अखेरीस नेतृत्व बदल अपेक्षित आहे. सध्याचे प्रमुख एम. शंकरन जुलैअखेरीस निवृत्त होणार आहेत.
VSSC मध्ये डॉ. यू. पी. राजीव
VSSC च्या प्रमुखपदी नियुक्ती होण्यापूर्वी डॉ. राजीव हे तिथेच असोसिएट डायरेक्टर (R&D) म्हणून कार्यरत होते. रॉकेट कंट्रोल आणि गायडन्स (Rocket Control & Guidance) या विषयात त्यांचा मोठा अनुभव आहे. इस्रोच्या अनेक ऐतिहासिक प्रक्षेपण वाहनांच्या (Launch Vehicles) मिशन डिझाइन आणि सिम्युलेशनमध्ये (Mission Simulation) त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तिरुवनंतपुरमच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून (CET) त्यांनी 'अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन'मध्ये पदवी घेतली. त्यानंतर NIT कालिकतमधून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल सिस्टिममध्ये पदव्युत्तर पदवी मिळवून त्यांनी इस्रोमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांनी IISC बंगळूरूमधून पीएचडी पूर्ण केली. डॉ. राजीव हे कोल्लम जिल्ह्यातील पठाणपुरमचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील उण्णिकृष्णन नायर आणि आई पद्माक्षीअम्मा आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. आशा पी. नायर यासुद्धा VSSC मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना पार्वती नायर नावाची मुलगी आहे.
LPSC मध्ये एन. जयन
एन. जयन यांनी LPSC चे प्रमुख होण्यापूर्वी तिथे असोसिएट डायरेक्टर, क्रायो स्टेज प्रोजेक्ट डायरेक्टर आणि VSSC मध्ये नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल (NGLV) प्रोजेक्ट डायरेक्टर अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. क्रायोजेनिक इंजिनच्या स्वदेशी विकासामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. LVM3 (GSLV मार्क 3) रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या CE20 क्रायोजेनिक इंजिनचा विकास करणाऱ्या टीमचे ते प्रमुख होते.
त्यांनी तिरुवनंतपुरमच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून (CET) मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ME पदवी पहिल्या रँकने मिळवली आहे. त्यांना 'ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया'चं स्पेस गोल्ड मेडल आणि इस्रोचे ३ टीम अवॉर्ड्स मिळाले आहेत. अंतराळ संशोधनातील योगदानाबद्दल त्यांना देशाचा सर्वोच्च विज्ञान सन्मान 'राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार' २०२५ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाईल. ते तिरुवनंतपुरममधील मन्नामूलाचे रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी शोभा जयन या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात वरिष्ठ लेखा अधिकारी आहेत. श्वेता आणि सिद्धार्थ ही त्यांची मुलं आहेत.