
बदलतं हवामान, प्रदूषण आणि काळजी न घेतल्यामुळे अनेकदा केस कोरडे आणि फ्रिझी (Frizzy Hair) होतात. अशा फ्रिझी केसांची स्टाईल करायची म्हणजे मोठी डोकेदुखी असते. केस सेट करण्यासाठी अनेक जण बाजारात मिळणारे हार्ड केमिकलवाले हेअर जेल वापरतात. या केमिकल जेलमुळे केस तात्पुरते शायनिंग आणि सेट झाल्यासारखे दिसतात खरे, पण नंतर केसांचे प्रचंड नुकसान होते.
जवसाच्या बिया केसांसाठी अमृतासारख्या काम करतात. जवसाच्या बिया पाण्यात उकळून त्याचे जेल बनवा. हे जेल केसांना लावल्याने केस एकदम स्मूद होतात आणि हेअर जेल लावल्यासारखा फील येतो. काही वेळानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हे एक प्रकारचे नॅचरल कंडिशनर आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांना उत्तम पोषण मिळते.
फ्रिझी केसांसाठी शुद्ध कोरफडीचा गर खूप फायदेशीर असतो. बाजारातल्या तयार जेलऐवजी घरातल्या कोरफडीच्या पानातून ताजा गर काढून केसांना लावा. यामुळे केसांना मस्त ओलावा मिळतो आणि केस सिल्की दिसू लागतात.
चिया सीड्स आरोग्यासोबतच केसांसाठीही उत्तम आहेत. चिया सीड्सपासून बनवलेले नॅचरल जेल कुरळ्या आणि फ्रिझी केसांवर अप्रतिम स्टाइलिंग जेलसारखे काम करते. यामुळे केस स्टाईल करणे खूप सोपे जाते. विशेषतः कुरळ्या केसांना यामुळे एक सुंदर टेक्स्चर आणि स्टाईल मिळते. यात प्रोटीन आणि पोषक तत्वे मुबलक असल्याने केसांचे आरोग्य सुधारते.
मेथीच्या दाण्यांची पेस्ट केसांना मऊ बनवते आणि केसांना एक हलका जेलसारखा टेक्सचर देते. मेथीमध्ये प्रोटीन, लोह, निकोटिनिक ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केस मजबूत करण्याचं काम करतात.
भेंडी उकळून तयार केलेलं जेल फ्रिझी केस कंट्रोल करण्यासाठी एक प्रसिद्ध उपाय आहे. हे लावल्यावर केसांना नॅचरल जेल लावल्यासारखं वाटतं. भेंडीमध्ये म्युसिलेज, व्हिटॅमिन ए, सी, के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे केसांमध्ये चमक येते आणि केस तुटणं कमी होतं.