
शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये का? या समजुतीमागील सत्य काय आहे?
शेंगदाणे (Peanuts) हा आपल्या रोजच्या आहारातील एक अत्यंत पौष्टिक घटक आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्त्वे असतात. पण शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं. पाणी प्यायल्यास घसा खवखवणे, खोकला किंवा पचनाच्या समस्या निर्माण होतात, असा समज आहे. या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामागील वैज्ञानिक सत्य समजून घेणं खूप गरजेचं आहे.
शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते का?
शेंगदाण्यांमध्ये फॅट्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते पचायला थोडा वेळ लागतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ले, तर काहींना पोट जड होणे, गॅस, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी पाणी पिण्यापेक्षा, शेंगदाणे जास्त प्रमाणात खाणे हे या समस्येचे मुख्य कारण असू शकते.
शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने घसा दुखतो किंवा खोकला येतो, याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही. मात्र, काहींना थंड पाणी प्यायल्यास घशात थोडा त्रास जाणवू शकतो. पण हा नियम सरसकट सर्वांना लागू होत नाही.
पाणी पिण्यासाठी किती वेळ थांबावे?
शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला तहान लागल्यास तुम्ही सामान्य तापमानाचे (रुम टेम्परेचर) पाणी पिऊ शकता. पाणी पिण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे थांबलेच पाहिजे, असा कोणताही वैद्यकीय नियम नाही. शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शेंगदाणे खाल्ल्यानंतर ओठ किंवा घसा सुजणे, अंगाला खाज सुटणे, उलट्या होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा घशाला सूज येणे हे गंभीर ॲलर्जीचे लक्षण असू शकते.
थोडक्यात सांगायचे तर, शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने आरोग्याला नुकसान होते, या भीतीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. शेंगदाणे नेहमी मर्यादित प्रमाणात खावेत आणि तहान लागल्यास खुशाल पाणी प्यावे. जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही विशिष्ट समस्या असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.