
iPhone 18 Pro Max : अॅप्पलचा (Apple) पुढचा फ्लॅगशिप स्मार्टपोन, आयफोन १८ प्रो मॅक्स (iPhone 18 Pro Max), लॉन्च व्हायला अजून बराच वेळ आहे, पण त्याबद्दलच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. ॲपलने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही, पण विश्लेषक आणि सप्लाय-चेनमधून आलेल्या लीक्सनुसार कंपनी हार्डवेअरमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. यात ऑन-डिव्हाइस आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बॅटरी लाईफ आणि फोटोग्राफीवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. आयफोन १८ सीरिजसोबतच आयफोन १८ प्रो मॅक्स सप्टेंबर २०२६ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
आयफोन १८ प्रो मॅक्सची अधिकृत घोषणा व्हायला अजून काही महिने बाकी असले तरी, याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. यातून एक असं चित्र समोर येतंय की, आयफोन युजर्सच्या अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न ॲपल करणार आहे.
या फोनमध्ये व्हेरिएबल ॲपर्चर टेक्नॉलॉजीसह नवीन ४८-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा हे सर्वात मोठ्या बदलांपैकी एक असण्याची शक्यता आहे. जर हे खरं ठरलं, तर युजर्सना डेप्थ-ऑफ-फील्ड इफेक्टवर अधिक नियंत्रण मिळेल आणि सेन्सरमध्ये येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कमी-जास्त करता येईल. ॲपल इमेजमधील नॉईज कमी करण्यासाठी थ्री-लेयर स्टॅक्ड इमेज सेन्सरवर काम करत असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय, टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरेसुद्धा ४८-मेगापिक्सलचे दिले जाण्याची शक्यता आहे. कमी प्रकाशात चांगली फोटो क्वालिटी मिळावी यासाठी टेलिफोटो कॅमेऱ्यासाठी नवीन ॲपर्चर कॉन्फिगरेशन दिले जाऊ शकते.
आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये ५,१०० ते ५,२०० mAh क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. याआधीच्या मॉडेलमध्ये ४,८२३ mAh बॅटरी वापरल्याची चर्चा होती, त्या तुलनेत ही बॅटरी मोठी असेल. या मोठ्या बॅटरीला जागा देण्यासाठी फोन ८.८ मिमी जाड आणि सुमारे २४० ग्रॅम वजनाचा असू शकतो.
हा फोन ॲपलच्या A20 प्रो प्रोसेसरवर चालेल, जो २-नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनलेला असेल. भविष्यातील AI फीचर्स आणि ॲपल इंटेलिजन्सच्या कामांसाठी या प्रोसेसरसोबत १२GB रॅम दिली जाईल, असंही म्हटलं जात आहे. याशिवाय, फोनमध्ये ६.९-इंचाचा डिस्प्ले कायम राहील, पण डायनॅमिक आयलंडचा कटआउट लहान केला जाण्याची शक्यता आहे. फोनच्या आत जास्त जागा मिळावी आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी ॲपल नवीन चिप पॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचंही समोर आलं आहे.
सध्याच्या लीक्सनुसार, फोनच्या पार्ट्सची किंमत वाढत असली तरी, ॲपल आयफोन १८ प्रो मॅक्ससाठी आपली सध्याचीच किंमत कायम ठेवू शकते. अनेक रिपोर्ट्समध्ये विश्लेषकांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की, या हँडसेटची किंमत आयफोन १७ प्रो मॅक्सच्या जवळपास असू शकते. मात्र, सप्लाय-चेनची परिस्थिती आणि उत्पादनानुसार लॉन्चच्या वेळी किंमतीत बदल होऊ शकतो.