आता केवळ चर्चा नाही, अत्यंत पातळ आयफोन १७ एअर येणार!

अ‍ॅपल कंपनीच्या इतिहासातील सर्वात पातळ आयफोन (आयफोन १७ एअर) लवकरच बाजारात येणार आहे.

कॅलिफोर्निया: अ‍ॅपल कंपनीच्या इतिहासातील सर्वात पातळ आयफोन येणार असल्याचे वृत्त आहे. आयफोन १७ एअर मॉडेलच्या निर्मितीचा एनपीआय (न्यू प्रॉडक्ट इंट्रोडक्शन) टप्पा सुरू झाल्याचे जीएसएम अरीनाने सप्लाय चेन सोर्सेसच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

आयफोन १७ सिरीजमध्ये प्लस मॉडेलऐवजी आयफोन १७ एअर हा पातळ फोन येईल, असे संकेत आधीच मिळाले होते. या फोन मॉडेलच्या एनपीआय टप्प्यात अ‍ॅपल प्रवेश केला आहे. नवीन उत्पादनाच्या योजना तयार करणे, डिझाइन तयार करणे यासारख्या व्यापक टप्प्याला न्यू प्रॉडक्ट इंट्रोडक्शन म्हणतात. आयफोन १७ एअर आता एनपीआय टप्प्यात प्रवेश केला आहे, असे जीएसएम अरीनाच्या वृत्तात म्हटले आहे. अ‍ॅपल आणि त्यांच्या पुरवठादारांनी आयफोन १७ एअरबाबत चर्चा सुरू केली असण्याची शक्यता आहे. त्यानंतरच असेंबलिंगबाबतचे करार होतील.

आयफोनच्या मागील सिरीजमधील प्लस मॉडेलऐवजी येणाऱ्या आयफोन १७ सिरीजमध्ये एअर व्हेरियंट येणार आहे. इतिहासातील सर्वात पातळ आयफोन म्हणून आयफोन १७ एअर ओळखला जाईल. या फोनची जाडी केवळ ६ मिलिमीटर असेल, असे संकेत आहेत. अलीकडेच लाँच झालेल्या आयफोन १६ आणि प्लसची जाडी ७.८ मिलिमीटर आणि प्रो आणि प्रो मॅक्सची जाडी ८.२५ मिलिमीटर आहे. आयफोन १७ एअरसह २०२५ च्या सप्टेंबरमध्ये आयफोन १७ सिरीज लाँच होण्याची शक्यता आहे.

Share this article