
मुंबई - तुम्ही जर तत्काळ तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत एक नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि ओटीपी पडताळणी अनिवार्य आहे. बनावट बुकिंग रोखण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांना प्राधान्य देण्यासाठी ही व्यवस्था लागू केली जात आहे.
ओटीपी आधारित व्यवस्था कशी काम करते?
कोणताही प्रवासी पीआरएस काउंटरवर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट घेऊ इच्छित असल्यास, त्यांना त्यांचा आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल नंबर द्यावा लागेल. त्या नंबरवर रेल्वेकडून ओटीपी पाठवला जाईल. प्रवाशांनी ओटीपी सिस्टीममध्ये टाकेपर्यंत तिकीट बुकिंग पूर्ण होणार नाही. ही नवी व्यवस्था सुरक्षितता वाढवण्यासोबतच बनावट नावांनी तिकीट बुकिंग होण्यास प्रतिबंध करते.
बनावट तिकिटांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
हे पाऊल तत्काळ तिकीट बुकिंगला अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि नियंत्रित करण्याच्या दिशेने एक मोठे प्रयत्न आहे, असे डीआरएम अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरच तिकीट बुक होईल अशी व्यवस्था केली आहे. बुकिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रेल्वेने प्रवाशांना त्यांचा आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक करण्याची विनंती केली आहे.
एजंटसाठीही वेळेची मर्यादा
रेल्वेने तिकीट दलाल आणि अधिकृत एजंटवरही निर्बंध आणले आहेत. आता अधिकृत एजंटना तत्काळ तिकीट बुकिंगसाठी वेळेची मर्यादा पाळावी लागेल, असे ज्येष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास खेडा यांनी सांगितले.
रेल्वेच्या या पावलामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये प्राधान्य मिळेल. दलालांचा हस्तक्षेप कमी होईल. ओटीपी आधारित पडताळणीमुळे बुकिंग प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित होईल. खरोखर प्रवास करू इच्छिणाऱ्यांना याचा फायदा होईल, नफा कमावण्याच्या उद्देशाने नाही. तिकीट मिळवणे अधिक सुरक्षित होईल, पण सावधगिरी बाळगा. रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या हितासाठी आहे, पण त्यासाठी तुम्हाला आधीच तुमचा आधारशी मोबाइल नंबर लिंक करावा लागेल. अन्यथा, शेवटच्या क्षणी तिकीट मिळणार नाही.