
Hyundai Creta भारताच्या कार बाजारात सध्या टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडियाने एक मोठा प्लॅन जाहीर केला आहे. कंपनी 2030 पर्यंत 20 पेट्रोल-डिझेल गाड्या (ICE) आणि 6 इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. इतकंच नाही, तर सध्याच्या मॉडेल्सनाही नवीन अपडेट्स आणि जनरेशन बदल दिले जाणार आहेत.
याच योजनेचा भाग म्हणून, कंपनीच्या दोन लोकप्रिय गाड्या - ह्युंदाई क्रेटा (मिड-साईज एसयूव्ही) आणि ह्युंदाई i20 (हॅचबॅक) - यांना नवीन जनरेशन अपडेट मिळणार आहे. नवीन क्रेटा 2026 मध्ये, तर नवीन i20 2027 मध्ये लाँच होईल. सध्या या दोन्ही मॉडेल्सची सुरुवातीची टेस्टिंग परदेशात सुरू झाली असून, त्या गाड्यांचे फोटोही समोर आले आहेत.
समोर आलेल्या स्पाय शॉट्सनुसार, नवीन जनरेशनची ह्युंदाई क्रेटा सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी मोठी असेल. ही एसयूव्ही नवीन K3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यामुळे गाडीला अधिक सरळ आणि बॉक्सी डिझाइन मिळेल. यातले बरेचसे बदल पुढच्या जनरेशनच्या किया सेल्टॉसप्रमाणेच असतील.
इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, 2026 च्या ह्युंदाई क्रेटामध्ये सध्याचेच 1.5L NA पेट्रोल (115bhp), 1.5L डिझेल (116bhp) आणि 1.5L टर्बो पेट्रोल (160bhp) इंजिन कायम राहतील. पण सर्वात मोठा बदल म्हणजे यात हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय दिला जाईल. कंपनीने अधिकृतपणे काहीही सांगितले नसलं तरी, 1.5L NA पेट्रोल इंजिनसोबत हायब्रीड टेक्नॉलॉजी दिली जाण्याची शक्यता आहे.
नवीन ह्युंदाई i20 मध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही, पण या हॅचबॅकमध्ये ह्युंदाईची नवीन मॉडर्न डिझाइन लँग्वेज वापरली जाईल. गाडीच्या आतमध्ये नवीन डिझाइनचा डॅशबोर्ड, नवीन अपहोल्स्ट्री, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 1 ADAS (ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. इंजिनच्या बाबतीत, नवीन ह्युंदाई i20 मध्ये सध्याचेच 1.2L नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतील.