Hyundai Price Hike : ह्युंदाई कार घेताय? सप्टेंबरपासून किमती वाढणार, वाढत्या दरामागे कारण काय?

Published : Aug 27, 2026, 02:47 PM IST
Hyundai Price Hike : ह्युंदाई कार घेताय? सप्टेंबरपासून किमती वाढणार, वाढत्या दरामागे कारण काय?

सार

ह्युंदाईने सप्टेंबर 2026 पासून आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या वर्षातील ही तिसरी दरवाढ असेल. ग्रँड i10 निओसपासून आयोनिक 5 पर्यंत सर्व मॉडेल्सना ही दरवाढ लागू होईल.

मुंबई : जर तुम्ही ह्युंदाईची नवी कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने जाहीर केलंय की, सप्टेंबर 2026 पासून त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमती 1 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या आणि वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. जागतिक राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे कंपनीच्या खर्चावर दबाव वाढत आहे. कंपनीने हा बोजा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला, पण खर्च सतत वाढत असल्याने त्याचा काही भाग ग्राहकांवर टाकावा लागत आहे, असं ह्युंदाईने स्पष्ट केलंय.

कोणत्या मॉडेलवर किती परिणाम?

ही दरवाढ ह्युंदाईच्या एन्ट्री-लेव्हल मॉडेल ग्रँड i10 निओसपासून ते प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही आयोनिक 5 पर्यंत सर्व गाड्यांना लागू होईल. सध्या ह्युंदाईच्या गाड्यांची किंमत अंदाजे 5.60 लाख रुपयांपासून 55.70 लाख रुपयांपर्यंत आहे. सप्टेंबरमध्ये कोणत्या मॉडेलची किंमत नेमकी किती वाढेल, हे त्या मॉडेल आणि व्हेरिएंटवर अवलंबून असेल.

2026 मधील ही तिसरी दरवाढ

विशेष म्हणजे, 2026 या वर्षात ह्युंदाई आपल्या गाड्यांच्या किमती तिसऱ्यांदा वाढवत आहे. याआधी 1 जानेवारीपासून कंपनीने गाड्यांच्या किमतीत सुमारे 0.6 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा एकदा 1 टक्का दरवाढीची घोषणा केली, जी 1 जूनपासून लागू झाली. त्यावेळी मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार गाड्यांच्या किमती 12,800 रुपयांपर्यंत वाढल्या होत्या.

निर्यातीलाही बसला फटका

या वर्षी ह्युंदाईच्या व्यवसायाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, म्हणजेच एप्रिल ते जून या काळात कंपनीच्या निर्यातीत मोठी घट झाली. पश्चिम आशियातील तणाव आणि कंपनीचा एक पुरवठादार असलेल्या 'मोबिस'च्या फॅक्टरीला लागलेली आग, यामुळे उत्पादनावर तात्पुरता परिणाम झाला होता. याचाच परिणाम निर्यातीवरही दिसून आला.

निर्यात 19.6 टक्क्यांनी घटली

मागील आर्थिक वर्षात याच काळात ह्युंदाईने 48,140 वाहनांची निर्यात केली होती. मात्र, 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा 38,708 युनिट्सवर आला. म्हणजेच निर्यातीत जवळपास 19.6% घट झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता लक्षात घेऊनच सप्टेंबरपासून ही नवीन दरवाढ लागू केली जात असल्याचं ह्युंदाईने म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold Loan : सोनं गहाण ठेवताय? 'कमी व्याज'च्या जाळ्यात अडकू नका, आधी या गोष्टी तपासा, मगच निर्णय घ्या
SBI Rules : महिन्यातून फक्त ४ वेळा मोफत पैसे काढता येणार, नंतर प्रत्येकवेळी चार्ज लागणार; नवा नियम काय?