
मुंबई : एका झोमॅटो युजरला फूड ऑर्डरवर लावलेला प्रचंड डिलिव्हरी चार्ज पाहून धक्काच बसला. त्याने या बिलाचा स्क्रीनशॉट X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला, जो लगेचच व्हायरल झाला. @Rudra_pvt_ नावाच्या या युजरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये जेवणाची मूळ किंमत ३७९ रुपये दिसत आहे. पण, त्यावर इतर अनेक प्रकारचे चार्ज लावण्यात आले होते, ज्यामुळे बिलाची रक्कम खूपच वाढली.
या स्क्रीनशॉटनुसार, ऑर्डरमध्ये रेस्टॉरंट पॅकिंग चार्ज १९ रुपये, डिलिव्हरी पार्टनर फी ७४४ रुपये, प्लॅटफॉर्म फी १४.९० रुपये आणि जीएसटी १४९.५० रुपये लावण्यात आले होते. हे सर्व चार्ज मिळून एकूण बिल १,३०६.४० रुपये झालं होतं. त्यानंतर युजरने एक रेस्टॉरंट कूपन वापरलं, ज्यामुळे बिल कमी होऊन १,१६६ रुपये झालं. एवढा मोठा डिलिव्हरी चार्ज पाहून युजरने कॅप्शन दिलंय, “ऑर्डर विमानाने डिलिव्हर होणार आहे का? 🤔”
Order flight se deliver hoga kya 🤔 pic.twitter.com/yaytaxBvnP
— . (@Rudra_pvt_) August 24, 2026
ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. काहींनी फूड डिलिव्हरी कंपन्यांवर अवाजवी शुल्क आकारल्याबद्दल टीका केली, तर काहींनी सांगितलं की अशा चार्जेसमुळे छोट्या ऑर्डरची किंमतही खूप वाढते.
एका युजरने स्विगी आणि स्विगी केअर्सला टॅग करत डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर टीका केली. तो म्हणाला, “😂😂😂@Swiggy @SwiggyCares सर्व्हिसच्या नावाखाली हे लोक रोज हजारो लोकांना मूर्ख बनवत आहेत आणि सर्व पैसे त्यांच्या खात्यात जातात. ते त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सची किती काळजी घेतात हे आम्हाला माहीत आहे.”
दुसऱ्या एका युजरने या अतिरिक्त शुल्कामुळे ग्राहकांच्या बजेटवर कसा परिणाम होतो हे सांगितलं. त्याने लिहिलं, “हे शुल्क आपल्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात, यावर नक्कीच काहीतरी मर्यादा असायला हवी.”
तिसऱ्या एका युजरने आपला असाच अनुभव शेअर करत दुसऱ्या फूड-डिलिव्हरी सर्व्हिससोबतच्या दरांची तुलना केली.