
Cat's Eye Nebula आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनात एक मोठी घडामोड समोर आली आहे. नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोप आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या युलिड स्पेस टेलिस्कोप यांनी मिळून 'कॅट्स आय नेब्युला'चा (Cat's Eye Nebula) एक जबरदस्त फोटो प्रसिद्ध केला आहे. हा नेब्युला म्हणजे एका मृत्यूपंथाला लागलेल्या ताऱ्याने बाहेर फेकलेल्या वायूच्या थरांपासून तयार झालेला एक ढग आहे. कॅट्स आय नेब्युला आपल्यापासून सुमारे 4,300 ते 4,400 प्रकाशवर्ष दूर ड्रॅको नक्षत्रात आहे.
या दोन्ही दुर्बिणींच्या एकत्रित निरीक्षणातून या नेब्युलाची गुंतागुंतीची रचना, त्यात पसरलेल्या वायूची वलयं आणि पूर्वी झालेल्या स्फोटांच्या खुणा स्पष्टपणे समोर आल्या आहेत. या फोटोच्या पार्श्वभूमीवर दूरवर असलेल्या अनेक आकाशगंगाही स्पष्ट दिसत आहेत.
नासाच्या अधिकृत ब्लॉगनुसार, युलिड टेलिस्कोपची रचना दूरच्या विश्वाचा अभ्यास करण्यासाठी केली असली तरी, तो जवळच्या खगोलीय वस्तूंचाही शोध घेऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. त्याच्या वाइड-फील्ड निअर-इन्फ्रारेड आणि व्हिजिबल कॅमेऱ्यांनी नेब्युलाच्या सभोवतालचे रंगीबेरंगी वायू, वलयं आणि धाग्यांसारखी रचना स्पष्टपणे टिपली आहे. पूर्वी ताऱ्यातून झालेल्या एका मोठ्या स्फोटातून बाहेर फेकले गेलेलं एक बाह्य वलयसुद्धा या फोटोत दिसतं.
दुसरीकडे, हबलच्या हाय-रिझोल्यूशन कॅमेऱ्याने नेब्युलाच्या केंद्रभागावर लक्ष केंद्रित केलं. तिथे वायूच्या कवचांसारख्या (gas shells) अनेक रचना स्पष्टपणे दिसल्या. शास्त्रज्ञांच्या मते, ही रचना म्हणजे ताऱ्याच्या शेवटच्या काळात झालेल्या शक्तिशाली स्फोटांचा एक 'फॉसिल रेकॉर्ड' (fossil record) म्हणजेच जीवाश्म पुरावा आहे.
1864 मध्ये कॅट्स आय नेब्युलावर केलेल्या स्पेक्ट्रोस्कोपी अभ्यासातून शास्त्रज्ञांना पहिल्यांदा कळलं होतं की, असे 'प्लॅनेटरी नेब्युला' हे पसरणाऱ्या वायूचे ढग असतात. आता युलिड आणि हबलच्या एकत्रित निरीक्षणांमुळे, ताऱ्याने वेळोवेळी आपलं वस्तुमान कसं गमावलं आणि तो मृत्यूच्या दिशेने कसा गेला, याचं अधिक स्पष्ट चित्र मिळत आहे.
हबलच्या ACS कॅमेऱ्याचा डेटा आणि युलिडच्या विशाल दृष्टिक्षेपाला एकत्र जोडून शास्त्रज्ञ आता या नेब्युलाच्या अनेक थरांच्या रचनेचा तपशीलवार अभ्यास करू शकत आहेत. यामुळे ताऱ्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काही शतकांमधील घडामोडींचा इतिहास पुन्हा तयार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नवीन शोधामुळे विश्वातील ताऱ्यांच्या जीवनचक्राच्या अभ्यासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संशोधकांना वाटतो.