
Tata Motors Festive Offers: सणासुदीचा काळ जवळ येत असल्यामुळे, ऑक्टोबर २०२६ मध्ये ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर्स घेऊन आल्या आहेत. शोरूम्समध्ये ग्राहकांची गर्दी वाढवण्यासाठी टाटा मोटर्सनेही आपल्या विविध मॉडेल्सवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केले आहेत. टियागो, अल्ट्रोझ, टिगोर, नेक्सॉन, कर्व्ह, हॅरियर आणि सिएरा या गाड्यांवर ग्राहक तब्बल १.२५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकतात.
टाटा मोटर्सच्या ऑक्टोबर ऑफर्समध्ये टाटा कर्व्ह (Tata Curvv) कारवर सर्वात जास्त डिस्काउंट दिला जात आहे. याखालोखाल नेक्सॉन, अल्ट्रोझ, हॅरियर आणि सफारी या गाड्यांचा नंबर लागतो. कर्व्ह एक्स (Curvv X) व्हेरियंटवर २०,००० रुपयांपर्यंतची ऑफर मिळत आहे. तर नॉन-एक्स (Non-X) व्हेरियंटवर तब्बल १.२५ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध आहे. यामध्ये ३०,००० रुपयांची कन्झ्युमर ऑफर, ४०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, ४५,००० रुपयांची स्क्रॅपेज ऑफर आणि पात्र ग्राहकांसाठी ५०,००० रुपयांच्या लॉयल्टी ऑफरचा समावेश आहे.
नॉन-एक्स व्हेरियंटच्या तुलनेत, कर्व्ह एक्स मॉडेल्सच्या डिझाईन आणि इंटिरिअरमध्ये थोडेफार बदल पाहायला मिळतात. काळ्या रंगाची ग्रिल आणि लेदरेट अपहोल्स्ट्री असलेली फिकट रंगाची केबिन हे या कारचं मुख्य आकर्षण आहे. रिक्लायनिंग रिअर सीट्स, खास एसी व्हेंट्स, स्लिम फ्रंट सीट बॅक आणि रिअर आर्मरेस्ट यांसारख्या सुविधाही यात मिळतात. याच्या टॉप-एंड व्हेरियंटमध्ये १२.३ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ट्विन झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ९-स्पीकर जेबीएल (JBL) ऑडिओ सिस्टीम, अँबियंट लायटिंग, ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि एअर प्युरिफायर देण्यात आलं आहे. जेस्चर कंट्रोल्ड पॉवर्ड टेलगेट आणि लेव्हल २ ADAS ही टॉप व्हेरियंटची खास वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, पॅनोरमिक सनरूफ, रेन सेन्सिंग वायपर्स आणि ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटरसह ३६०-डिग्री कॅमेरा देखील कर्व्ह कारमध्ये मिळतो.
टाटा कर्व्ह सिरीज सी (Series C) कारमध्ये ३ इंजिनचे पर्याय मिळतात. १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १२० bhp पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करतं. १.२ लिटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिन १२५ bhp पॉवर आणि २२५ Nm टॉर्क देतं. तर १.५ लिटर डिझेल इंजिन ११८ bhp पॉवर आणि २६० Nm टॉर्क निर्माण करतं. ट्रान्समिशनबद्दल बोलायचं झाल्यास, यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. सणासुदीच्या या बंपर ऑफर्समुळे कर्व्ह कार बाजारात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करेल, अशी टाटा मोटर्सला अपेक्षा आहे.