Aadhaar Misuse : तुमचं आधार कार्ड कोणी चुकीच्या कामासाठी वापरत नाहीये ना? २ मिनिटांत घरी बसून तपासा

Published : Aug 07, 2026, 05:39 PM IST
Aadhaar Misuse : तुमचं आधार कार्ड कोणी चुकीच्या कामासाठी वापरत नाहीये ना? २ मिनिटांत घरी बसून तपासा

सार

Aadhaar Card Misuse : UIDAI च्या वेबसाईटवर "Aadhaar Authentication History" या ऑप्शनवर जाऊन गेल्या ६ महिन्यांत तुमचं आधार कुठे वापरलं गेलंय, हे तपासा. काही संशयास्पद आढळल्यास, लगेच बायोमेट्रिक लॉक करा.

मुंबई : आजकाल आधार कार्डशिवाय आपलं पानही हलत नाही. बँक खातं, सिम कार्ड, पॅन कार्डपासून ते सरकारी सबसिडीपर्यंत - सगळीकडे आधार लागतंच. त्यामुळे आधार कार्ड म्हणजे फक्त एक कार्ड नाही, तर ती तुमची दुसरी ओळख बनली आहे. आणि म्हणूनच, ते चुकीच्या हातात पडलं तर मोठा धोका होऊ शकतो.

अनेकांना वाटतं की आधार कार्ड तर आपल्या पाकिटात सुरक्षित आहे, मग त्याचा चुकीचा वापर कसा होणार? पण सत्य हे आहे की तुमचा फक्त १२ अंकी आधार नंबर जरी लीक झाला, तरी ऑनलाईन KYC करणं शक्य आहे. त्यामुळे कार्ड हातात आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात, असं समजणं चुकीचं आहे.

मग उपाय काय? तुमचं आधार कार्ड कुणी चुकीच्या कामासाठी वापरत आहे की नाही, हे कसं ओळखायचं?

घाबरू नका. UIDAI ने स्वतः यावर एक सोपा उपाय दिला आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या आधार वापराचा संपूर्ण हिस्ट्री मोफत तपासू शकता. म्हणजे, गेल्या काही महिन्यांत तुमचा आधार नंबर व्हेरिफिकेशनसाठी कुठे-कुठे वापरला गेला, याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला मिळेल.

यासाठी, सगळ्यात आधी http://uidai.gov.in  या वेबसाईटवर जा. तिथे 'My Aadhaar' सेक्शनमध्ये 'Aadhaar Authentication History' नावाचा एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन केलं की तुमचं काम झालं.

लॉग इन झाल्यावर, तुम्ही एक विशिष्ट कालावधी निवडू शकता. तो निवडताच, त्या काळात तुमचं आधार किती वेळा वापरलं गेलं, हे दिसेल. व्हेरिफिकेशन कसं झालं - म्हणजे OTP द्वारे, बोटांच्या ठशांद्वारे की डोळ्यांच्या बुबुळांद्वारे (iris scan) - याचीही माहिती तिथे दिलेली असते.

ही लिस्ट तपासताना जर तुम्हाला अशी एखादी तारीख किंवा व्यवहार दिसला, जिथे तुम्ही आधार वापरल्याचं आठवत नाही, तर मात्र लगेच सावध होण्याची गरज आहे. याचा अर्थ, तुमच्या नकळत कुणीतरी तुमचं आधार वापरत आहे.

असं काही दिसल्यास ताबडतोब दोन गोष्टी करा. पहिलं काम म्हणजे, mAadhaar ॲप किंवा UIDAI च्या साईटवरून तुमचं बायोमेट्रिक लॉक करा. एकदा लॉक केलं की, तुमच्या परवानगीशिवाय बोटांचे ठसे वापरून कोणीही व्हेरिफिकेशन करू शकणार नाही. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ते पुन्हा अनलॉक करू शकता. दुसरं काम म्हणजे, एक व्हर्च्युअल आयडी (Virtual ID) तयार करा. हा १६ अंकी नंबर असतो. यापुढे, जिथे गरज असेल तिथे मूळ आधार नंबरऐवजी हा VID वापरा. यामुळे तुमचा मूळ आधार नंबर सुरक्षित राहील.

याशिवाय आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा. जसं की, आधार कार्डची झेरॉक्स देताना त्यावर लाल शाईने कोणत्या कामासाठी देत आहात, ते लिहा. सोबत तारीख टाका आणि सही करा. कोणत्याही दुकानात आधारचा QR कोड स्कॅन करू देऊ नका. अनोळखी नंबरवरून फोन आल्यास OTP अजिबात शेअर करू नका. लक्षात ठेवा, बँक किंवा UIDAI कधीही फोन करून OTP विचारत नाही.

त्यामुळे, दर २-३ महिन्यांनी एकदा ही हिस्ट्री तपासाची सवय लावून घ्या. याला २ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही, पण तुमचं आधार सुरक्षित ठेवण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Credit Score: एकदा खाली आलेला सिबिल स्कोअर पुन्हा वाढायला किती वेळ लागतो? जाणून घ्या
Cash At Home: घरी किती कॅश ठेवावी, जास्त पैसे ठेवल्यास काय होऊ शकतं?