
How to Check Mawa Quality: सणासुदीच्या दिवसांत किंवा खास कार्यक्रमांसाठी मिठाई बनवताना खव्याचा (मावा) मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण, आजकाल बाजारात बनावट आणि भेसळयुक्त खवा सुद्धा सहज मिळतो, जो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे, खवा खरेदी करण्यापूर्वी तो खरा आहे की बनावट, हे ओळखता येणं महत्त्वाचं आहे. अस्सल खवा ओळखण्याचे पाच सोपे आणि खात्रीशीर मार्ग आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
अस्सल खव्याला दुधासारखा आणि ताजा वास येतो. जर खव्यातून तीव्र, केमिकलसारखा किंवा विचित्र वास येत असेल, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे. बनावट खव्यामध्ये अनेकदा कृत्रिम सुगंध वापरला जातो, जो लगेच ओळखता येतो.
खरा खवा साधारणपणे हलक्या क्रीम किंवा ऑफ-व्हाइट रंगाचा असतो. जर खवा खूप जास्त पांढराशुभ्र, चमकदार किंवा पिवळसर दिसत असेल तर सावध राहा. त्यात केमिकल किंवा स्टार्च मिसळल्यामुळे त्याचा रंग बदलतो. अस्सल खवा कधीही जास्त चमकदार नसतो.
आपल्या हातावर थोडासा खवा घ्या आणि त्याला दाबून बघा. खरा खवा मऊ असतो आणि दाबल्यावर थोडा तुटतो. याउलट, बनावट खवा खूप गुळगुळीत किंवा रबरासारखा वाटू शकतो. जर दाबल्यावर खवा हाताला चिकटत असेल, तर तो खरेदी करू नका.
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात थोडा खवा टाका. अस्सल खवा हळूहळू विरघळतो आणि पाण्याचा रंग फारसा बदलत नाही. याउलट, बनावट खवा पाण्यात लगेच विरघळून पाणी दुधासारखं पांढरं करतो, जे भेसळीचं लक्षण आहे.
अस्सल खव्याची चव किंचित गोड आणि दुधासारखी असते. जर चव कडवट, विचित्र गोड किंवा केमिकलसारखी लागत असेल, तर तो खवा बनावट असू शकतो. खरेदी करण्यापूर्वी थोडासा खवा चाखून पाहणे नेहमीच चांगले.