
ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स आणि पॉवरट्रेन बनवणाऱ्या हिरो मोटर्सने १००० कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे. हा आयपीओ १६ सप्टेंबरला खुला झाला असून १८ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. कंपनीने एका शेअरची किंमत ७९ ते ८४ रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना किमान १७८ शेअर्स आणि त्यानंतर त्याच्या पटीत बोली लावावी लागेल.
या आयपीओमध्ये ६०० कोटींचे फ्रेश शेअर्स आणि ४०० कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) आहे. ओएफएसद्वारे प्रमोटर ओपी मुंजाल होल्डिंग्स आणि हिरो सायकल्स आपला वाटा विकत आहेत. अप्पर प्राइस बँडनुसार कंपनीचे मार्केट कॅप ३,८१५ कोटी रुपये आहे. यातून मिळणाऱ्या निधीपैकी १९० कोटी रुपये कर्जफेडीसाठी आणि २०० कोटी रुपये गौतम बुद्ध नगर कारखान्यातील पॉवरट्रेन क्षमता वाढवण्यासाठी वापरले जातील.
आयपीओ खुला होण्याच्या एक दिवस आधी, १५ सप्टेंबरला हिरो मोटर्सने अँकर गुंतवणूकदारांकडून २९९.९९ कोटी रुपये उभे केले. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना ८४ रुपये प्रति शेअर या दराने ३.५७ कोटी शेअर्स दिले आहेत. यातील जवळपास ८२ टक्के वाटा ७ देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्यांनी १६ स्कीम्सच्या माध्यमातून खरेदी केला आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, एडलवाइज लाइफ इन्शुरन्स, सोसायटी जनरल, ३पी इंडिया इक्विटी फंड आणि एएसएएस ग्लोबल फंड यांसारख्या बड्या संस्थांनी यात गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल स्मॉलकॅप, कोटक एमएनसी आणि जेएम फ्लेक्सी कॅप फंड आघाडीवर आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, डॅम कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर केफिन टेक्नॉलॉजीज रजिस्ट्रार आहे. हे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होतील.
हिरो मोटर्सचा व्यवसाय दोन मुख्य विभागांत विभागला आहे. पहिला पॉवरट्रेन सोल्युशन्स, ज्याने FY26 मध्ये ५३.७ टक्के महसूल दिला. यात गिअर्स, ट्रान्समिशन आणि बाईक पॉवरट्रेनचा समावेश आहे. दुसरा विभाग अलॉयज आणि मेटॅलिक्स (A&M) आहे, ज्यातून ४६.३ टक्के महसूल आला. यात स्टँड, स्विंग आर्म्स आणि इंजिन गार्ड्स बनवले जातात. कंपनी २३ देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. FY26 मध्ये आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून ४१.४ टक्के महसूल मिळाला. बीएमडब्ल्यू, डुकाटी, फॉर्म्युला मोटरस्पोर्ट आणि हमिंगबर्ड ईव्ही यांसारख्या दिग्गज कंपन्या त्यांचे क्लायंट आहेत.
एकूण महसुलाची वाढ संथ असली तरी, ईव्ही बिझनेस मात्र सुसाट धावतोय. FY24 मधील १२८ कोटींचा ईव्ही महसूल FY26 मध्ये ४६.१ टक्के सीएजीआरने २७३ कोटींवर पोहोचला. FY26 मध्ये वाढलेल्या ९९ कोटींच्या अतिरिक्त महसुलापैकी ९८ कोटी फक्त ईव्ही विभागातून आले आहेत. पॉवरट्रेन मार्जिन १६.३ टक्क्यांवर गेले आहे. पण A&M विभाग FY24 मधील २९.९ कोटींच्या नफ्यावरून FY26 मध्ये १५.९ कोटींच्या तोट्यात गेला आहे.
कंपनीचा एकूण महसूल FY24 मधील १,०६४ कोटींवरून FY26 मध्ये १,१८८ कोटींवर पोहोचला (दोन वर्षांचा सीएजीआर ५.७%). याच काळात एबिटडा (EBITDA) ८६.३ कोटींवरून १४७.८ कोटींवर (३०.९% सीएजीआर) आणि निव्वळ नफा (PAT) १७ कोटींवरून ४१.२ कोटींवर (५५.५% सीएजीआर) वाढला. FY26 पर्यंत कंपनीवर एकूण ४००.८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
गौतम बुद्ध नगर प्लांट FY26 मध्ये ८८.३ टक्के क्षमतेने काम करत असल्याने, तिथे २०० कोटी रुपये खर्चून विस्तार केला जातोय. मात्र, परदेशातील कारखान्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाहीये. थायलंड प्लांटचा वापर FY24 मधील १२ टक्क्यांवरून FY26 मध्ये ३.९ टक्क्यांवर घसरला आणि तिथे ६.७ कोटींचा तोटा झाला. युके प्लांटची क्षमताही फक्त २४.२ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे रिपोर्ट्स सांगतात.
हिरो मोटर्सच्या आयपीओचा प्रवास यापूर्वी दोनदा बदलला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ९०० कोटींसाठी ड्राफ्ट पेपर दाखल केले आणि ऑक्टोबरमध्ये ते मागे घेतले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये १,२०० कोटींसाठी अर्ज केला आणि आता शेवटी १,००० कोटींचा आयपीओ बाजारात आणला आहे.
FY26 च्या कमाईनुसार कंपनीचा पी/ई (P/E) रेशिओ ९२.७ पट आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा सरासरी पी/ई रेशिओ फक्त ४६.७ पट आहे. याचा अर्थ हिरो मोटर्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दुप्पट व्हॅल्युएशनची अपेक्षा करत आहे. FY26 मध्ये रिटर्न ऑन नेट वर्थ ८.६ टक्के आहे. ईव्ही विभाग चांगली कामगिरी करत असला तरी, नॉन-ईव्ही व्यवसायातील मंदी, A&M मधील तोटा आणि परदेशी युनिट्सचा कमी वापर या सर्व कारणांमुळे हे व्हॅल्युएशन खूप जास्त असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.