जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसमधील दोन योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक, व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कम या तिन्ही टप्प्यांवर संपूर्ण कर सवलत मिळते. त्यामुळेच गुंतवणूकदारांमध्ये या योजना खूप लोकप्रिय आहेत.
24
कोणत्या आहेत योजना?
मुलींच्या भविष्यासाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) सध्या सर्वाधिक ८.२% व्याज देते. यात वार्षिक १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कलम ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते. २१ वर्षांनी मिळणारी रक्कमही पूर्णपणे करमुक्त असते. दुसरीकडे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही १५ वर्षांची योजना असून सध्या ७.१% व्याजदर आहे. यातही १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ८०सी अंतर्गत कर सूट मिळते आणि मॅच्युरिटीची रक्कम टॅक्स फ्री असते.
34
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
काही योजनांमध्ये फक्त गुंतवणुकीवर कर सवलत मिळते, पण व्याजावर टॅक्स लागतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून व्याजदर ७.७% आहे. यातील गुंतवणुकीवर ८०सी अंतर्गत सूट आहे. विशेष म्हणजे, पहिल्या चार वर्षांच्या व्याजाला फेरगुंतवणूक मानून त्यावरही ८०सी अंतर्गत कर सवलत घेता येते, पण पाचव्या वर्षी मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागतो. ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतही (SCSS) फक्त गुंतवणुकीवरच सूट मिळते, व्याजावर नाही.
मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि किसान विकास पत्र (KVP) या योजना चांगला परतावा देतात, पण यांच्या गुंतवणुकीवर कलम ८०सी अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही. इतकंच नाही, तर यातून मिळणाऱ्या व्याजावरही तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे जर तुमचा उद्देश कर वाचवणे असेल, तर या योजना तुमच्यासाठी नाहीत.