मुंबई : भारतात गेल्या सहा वर्षांत सोन्याची किंमत जवळपास तिप्पट झाली आहे. हाच ट्रेंड पाहता, 2050 पर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 14 ते 22 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जागतिक स्तरावर बोलायचं झाल्यास, एका औंस सोन्याची किंमत 10 हजार डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते.
आपल्याकडे सोनं म्हणजे फक्त दागिना नाही, तर एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक आहे. इतिहास पाहिला तर सोन्याचे भाव नेहमीच वाढत राहिले आहेत. विशेषतः महागाई, आर्थिक अस्थिरता आणि जागतिक राजकीय तणाव यांसारख्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढतात. त्यामुळे, 2050 मध्ये सोन्याचे भाव काय असतील, याची उत्सुकता अनेकांना आहे.
एका अंदाजानुसार, जानेवारी 2026 पर्यंत भारतात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव सुमारे 1,42,540 रुपये किंवा प्रति ग्रॅम 14,254 रुपये असू शकतो. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,30,660 रुपये आणि प्रति ग्रॅम 13,066 रुपये असू शकतो. गेल्या सहा वर्षांत सोन्याची किंमत जवळपास तिप्पट झाली आहे. 2020 मध्ये 50,000 रुपये असलेला भाव आता 1,42,540 रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
गेल्या 30 वर्षांची आकडेवारी तपासल्यास, सोन्याच्या भावात सरासरी 10.83% वाढ झाली आहे, तर 20 वर्षांत ही वाढ 14.35% राहिली आहे. गेल्या 15 वर्षांत सरासरी 12% परतावा मिळाला आहे. यामागे महागाई आणि रुपयाचं अवमूल्यन ही प्रमुख कारणं आहेत. यूएस डॉलरमध्ये पाहिल्यास, सोन्याच्या दरात वार्षिक 5-7% वाढ दिसून येते.
अंदाजानुसार, 2030 पर्यंत सोन्याचा भाव प्रति औंस 5 ते 10 हजार यूएस डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. याच आधारावर तज्ज्ञांनी 2040-2050 पर्यंतच्या दरांचा अंदाज वर्तवला आहे. आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, 2050 पर्यंत प्रति औंस सोन्याची किंमत 10 हजार यूएस डॉलरच्या पुढे जाईल. काही तज्ज्ञांच्या मते तर हा आकडा 15 ते 20 हजार यूएस डॉलरपर्यंतही पोहोचू शकतो. भारतात रुपयाच्या मूल्यावर आधारित सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत सोन्याची किंमत सध्याच्या मूल्यापेक्षा 6 ते 8 पटींनी वाढू शकते.
मागील आकडेवारीच्या आधारे, 2050 पर्यंत सोन्याच्या दरात वार्षिक 10% वाढ झाली, तरी 24 कॅरेट सोन्याचा भाव 14-15 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. जर ही वाढ 12% (CAGR) दराने झाली, तर भाव 21-22 लाखांपर्यंतही जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 12.8 लाख रुपये किंवा 19.8 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. हे केवळ सरासरी अंदाज आहेत, प्रत्यक्ष किमतीत बदल होऊ शकतो.
समजा, तुम्ही आज 24 कॅरेट सोन्यात एक लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला सुमारे 7.016 ग्रॅम सोनं मिळेल. वार्षिक 10% CAGR दराने 2050 पर्यंत या गुंतवणुकीचं मूल्य सुमारे 9.85 लाख रुपये होईल. तर 11-12% CAGR दराने हेच मूल्य 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतं. याउलट, तुम्ही एक लाख रुपये बँकेत ठेवल्यास, 2050 पर्यंत त्याचं मूल्य 4.17 ते 5.29 लाख रुपये होऊ शकतं. मात्र, ग्राहकांनी हे लक्षात ठेवायला हवं की सोन्यातील गुंतवणुकीतही धोका असतो. दीर्घकालीन योजना चांगला नफा देऊ शकतात, पण गुंतवणुकीचा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असतो.