
Gujiya Recipe Without Breaking: होळी असो किंवा कोणताही सण, घरी गुजिया म्हणजेच करंज्या बनवणं ही एक परंपराच आहे. पण अनेकदा खूप मेहनतीने बनवलेल्या गुजिया तेलात टाकताच फुटतात. सगळं सारण बाहेर येतं, तेल खराब होतं आणि गुजियांची पण वाट लागते. खरंतर, गुजिया फुटण्याचं कारण आतलं सारण नाही, तर पीठ मळताना आणि मोहन (तुपाचं प्रमाण) घालताना होणाऱ्या चुका असतात. जर तुम्ही काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमच्या गुजिया नेहमी परफेक्ट, खुसखुशीत आणि सुंदर आकारात तयार होतील.
गुजियाच्या पिठात मोहन म्हणजेच तुपाचं प्रमाण अगदी योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जर मोहन कमी झालं, तर पारी कडक होते आणि तळताना तिला तडे जाऊ शकतात. दुसरीकडे, जास्त मोहन घातल्यास पीठ तेलकट होतं आणि गुजियाच्या कडा नीट चिकटत नाहीत. योग्य पद्धत म्हणजे, पिठात इतकं तूप घाला की मूठ दाबल्यावर पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. हे परफेक्ट मोहनचं लक्षण आहे.
गुजियाचं पीठ पुरीच्या पिठासारखं मऊ नसावं आणि खूप जास्त घट्टही नसावं. जास्त मऊ पीठ तळताना फुगतं आणि कडेने उघडतं. तर खूप घट्ट पीठ लाटतानाच फाटू शकतं. पीठ मध्यमसर घट्ट ठेवा आणि मळल्यानंतर कमीत कमी २० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पिठातील ग्लूटेन सेट होतं आणि पारी चांगली बनते.
अनेकजण घाईघाईत गुजिया बंद करतात, पण त्याच्या कडा व्यवस्थित दाबणं गरजेचं आहे. कडांना थोडं पाणी किंवा मैद्याची पेस्ट (साटी) लावून बंद करा. हवं असल्यास, काट्याच्या चमच्याने दाबून डिझाइन बनवा, यामुळे गुजिया उघडण्याची शक्यता कमी होते.
खूप कडकडीत गरम तेलात गुजिया टाकल्यास बाहेरचं आवरण लगेच कडक होतं आणि आत वाफ तयार होऊन ती फुटू शकते. तर थंड तेलात टाकल्यास गुजिया जास्त तेल पितात आणि तुटू शकतात. तेल मध्यम आचेवर किंचित गरम करा आणि मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.