
मुंबई : सणासुदीचा काळ सुरू झाला की ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर बंपर डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्सचा पाऊस पडतो. या आकर्षक ऑफर्स पाहून आपण घाईघाईत खरेदी करतो, पण आपले पैसे नेमके कुठे जात आहेत, याकडे लक्ष द्यायला विसरतो. फेक शॉपिंग वेबसाइट्स, बोगस सेलर्स आणि फसव्या पेमेंट लिंक्समुळे तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, कशानेही पेमेंट करत असाल, तरी फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यापूर्वी या पाच गोष्टी नक्की तपासा.
पैसे देण्यापूर्वी तुम्ही वापरत असलेली वेबसाइट किंवा ॲप खरं आहे की नाही, याची खात्री करा. वेबसाइटच्या स्पेलिंगमधील चुका, संशयास्पद लिंक्स आणि मोठ्या ब्रँड्ससारख्या दिसणाऱ्या फेक वेबसाइट्सपासून सावध राहा.
एखाद्या अनोळखी सेलरने खूप मोठा डिस्काउंट दिला, तर लगेच ऑर्डर करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासा. ग्राहकांचे रिव्ह्यूज, रिटर्न आणि रिफंड पॉलिसी, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि कस्टमर केअरची माहिती नक्की तपासून पाहा.
नेहमीच्या पेमेंट पद्धतीचा वापर करतानाही ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यापूर्वी डिटेल्स नीट तपासणं महत्त्वाचं आहे. UPI ने पेमेंट करताना स्क्रीनवर दिसणारं नाव आणि रक्कम बरोबर असल्याची खात्री करा. लक्षात ठेवा, पैसे 'मिळवण्यासाठी' कधीही UPI पिन टाकावा लागत नाही. कार्डने पेमेंट करतानाही ट्रान्झॅक्शनला परवानगी देण्यापूर्वी रक्कम तपासा. अनोळखी वेबसाइट्सवर कार्ड डिटेल्स सेव्ह करणं टाळा.
फ्लॅश सेल, काउंटडाउन टायमर आणि अवाढव्य डिस्काउंट्स पाहून ग्राहक लगेच खरेदीला भुलतात. अनेक ऑफर्स खऱ्या असल्या, तरी स्कॅमर्स याच ट्रिक्स वापरून ग्राहकांना फेक लिंक्सवर पाठवतात आणि त्यांचे पेमेंट डिटेल्स चोरतात.
पैसे देण्यापूर्वी इतर विश्वासार्ह प्लॅटफॉर्म्सवर किमतींची तुलना करा. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन ऑफर खरी आहे का, याची खात्री करा.
OTP, UPI पिन आणि बँकिंग पासवर्ड या अत्यंत गोपनीय गोष्टी आहेत. बँक, पेमेंट नेटवर्क किंवा खरे कस्टमर केअर प्रतिनिधी कधीही फोन, मेसेज किंवा ईमेलद्वारे अशी माहिती मागत नाहीत.