Salary Management : महिन्याला 1.3 लाख पगार, तरीही खिसा रिकामाच! तरुणाची पोस्ट व्हायरल

Published : Oct 02, 2026, 02:19 PM IST
Salary Management : महिन्याला 1.3 लाख पगार, तरीही खिसा रिकामाच! तरुणाची पोस्ट व्हायरल

सार

महिन्याला १.३ लाख रुपये पगार असूनही महिन्याशेवटी हातात काहीच उरत नाही, अशी व्यथा मांडणाऱ्या एका तरुणाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढता खर्च आणि लाइफस्टाइलमुळे ही वेळ आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

मुंबई : महिन्याला लाखो रुपये पगार असणाऱ्यांना पैशांची चणचण भासत नसेल, असा आपला सर्वसामान्य समज असतो. पण हा समज खोटा ठरवणारी एका तरुण कर्मचाऱ्याची पोस्ट सध्या चर्चेत आहे. या तरुणाला महिन्याला १.३ लाख रुपये पगार मिळतो, तरीही महिन्याशेवटी त्याच्याकडे पैसे उरत नाहीत. त्याचं हे बजेट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

"लहानपणी महिन्याला १.३ लाख रुपये पगार मिळवणं हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखं होतं. एवढे पैसे कमवले की पैशांची चिंता करावी लागणार नाही, असं मला वाटायचं. पण आज हा सगळा पैसा नेमका कुठे जातोय, हेच मला समजत नाहीये," असं या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

तरुणाच्या महिन्याच्या खर्चाचा हिशोब असा:

तरुणाने आपल्या महिन्याच्या खर्चाचा पूर्ण हिशोब दिला आहे:

  • घरभाडं: ₹३०,०००
  • ईएमआय (EMI): ₹१५,०००
  • कुटुंबासाठी खर्च: ₹१२,०००
  • एसआयपी (SIP) / गुंतवणूक: ₹१०,०००
  • किराणा / जेवण: ₹८,०००
  • प्रवास / पेट्रोल: ₹७,०००
  • लाईट, इंटरनेट, फोन बिल: ₹६,०००
  • विमा / वैद्यकीय खर्च: ₹५,०००
  • कपडे, घरातील वस्तू: ₹५,०००
  • किरकोळ यूपीआय (UPI) पेमेंट्स: ₹५,०००
  • बाहेरचं जेवण: ₹४,०००
  • ओटीटी (OTT) सबस्क्रिप्शन: ₹३,०००
  • इतर खर्च: ₹१०,०००

एकूण खर्च: ₹१,२०,०००

या सगळ्या खर्चामधून महिन्याशेवटी फक्त १०,००० रुपये उरतात. पण हे पैसे आपत्कालीन परिस्थितीसाठीही पुरत नाहीत, असं तो म्हणतो. "कधी २५० रुपयांचं जेवण ऑर्डर करतानाही मला विचार करावा लागतो की हे मला परवडेल का. मला कोणतेही मोठे शौक नाहीत, पण शेकडो छोट्या-छोट्या खर्चामुळे माझा पगार संपून जातो. जेव्हा आर्थिक जबाबदाऱ्या अंगावर पडतात, तेव्हाच लाखो रुपये पगार असण्याचं वास्तव समजून येतं," असंही त्याने पुढे सांगितलं.

नेटकऱ्यांचा सल्ला

या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. महिन्याला ३,००० रुपये फक्त ओटीटी सबस्क्रिप्शनवर खर्च करणं चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. गरजेनुसार फक्त एक किंवा दोनच ॲप्स वापरावेत, असा सल्ला त्यांनी दिला.

पैसा कुठे जातोय हे समजण्यासाठी 'स्पेंड ट्रॅकिंग' ॲप्स वापरण्याचा सल्ला काहींनी दिला. 'इतर खर्च' या नावाखाली जाणाऱ्या पैशांचाही हिशोब ठेवायला हवा. घरभाडं, ईएमआय आणि कुटुंबासाठीचा खर्च यातच जवळपास ५७,००० रुपये जातात. मध्यमवर्गीय पगार असूनही हाय-फाय लाइफस्टाइल जगण्याचा प्रयत्न केल्यामुळेच ही आर्थिक ओढाताण होत असल्याचं काही युजर्सनी निदर्शनास आणून दिलं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Semiconductor : टेक बूमचा फायदा घ्यायचा असेल, तर भारताला योग्य चिप्सची गरज
Elon Musk : इन्स्टाग्राम फक्त मुलींसाठी, मस्कच्या कमेंटने X वर नवा वाद