
मुंबई : डायसन (Dyson) कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक टूथब्रश लॉन्च केला आहे, ज्यात AI कॅमेरा आणि फ्लॉसर आहे. पण याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल - तब्बल 499.99 डॉलर, म्हणजे जवळपास ४७,००० रुपये! हे उत्पादन बाजारात येताच सोशल मीडियावर याच्या अवाच्या सवा किमतीवरून आणि गरजेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तर प्रायव्हसीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
डायसनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, 'या कॅमेरा जेट इलेक्ट्रिक टूथब्रशमुळेच तुम्ही दातांमधील फटी आणि अचूकपणे फ्लॉसिंग करू शकता, ज्यामुळे तोंड आणि दात अधिक स्वच्छ राहतील.' या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
काही जणांनी या उत्पादनाला थेट नाकारलं, तर काहींनी ही एक गरजेची वस्तू असल्याचं म्हटलं. पण अनेकांनी प्रायव्हसीचा मुद्दा उचलून धरला. टूथब्रशमधील कॅमेऱ्यामुळे लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावलं जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
एका युझरने गंमतीत विचारलं, 'मी याचा व्हिडिओ यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करू शकतो का?' तर दुसऱ्याने प्रश्न केला, 'याची काय गरज आहे??? लोकांना दात कसे घासायचे हे माहीत नाही का? त्यासाठी कॅमेरा असलेला ब्रश हवाय का?'
एका दंतवैद्यकीय विद्यार्थ्याने मात्र यात रस दाखवला. 'मी चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे आणि पुढच्या वर्षी पासआऊट होईन. मला हे उत्पादन तपासायला खूप आवडेल,' असं त्याने लिहिलं.
डायसनच्या मते, हा पहिला असा टूथब्रश आहे ज्यात कॅमेरा आहे, ज्यामुळे तुम्ही दातांमधील फटी थेट बघून स्वच्छ करू शकता. हा ब्रश तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 100K पिक्सेलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा वापरला आहे, जो सेकंदाला २८ फोटो काढू शकतो. 'My Dyson' ॲप वापरून हे फोटो पाहता येतात.
कंपनीने हेही स्पष्ट केलं आहे की, युझर्स कॅमेरा कधीही चालू किंवा बंद करू शकतात. दात घासताना दिसणारे फोटो किंवा व्हिडिओ डायसन किंवा क्लाउडवर कुठेही सेव्ह केले जाणार नाहीत, असं आश्वासन कंपनीने दिलं आहे.