
Driving Tips : भारतात आजही बहुतेक कार चालक मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली वाहने वापरतात. अशा कार चालवताना योग्य तंत्र आणि सवयींचे पालन न केल्यास कारचे नुकसान होऊ शकते आणि मेंटेनन्स खर्चही वाढतो. ड्रायव्हिंगमध्ये काही सामान्य चूका आपण नकळत करतो, ज्यामुळे गिअरबॉक्स, क्लच, इंजिन आणि टायरवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे या चुका वेळेवर ओळखून त्यापासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बहुतांश चालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे गाडी चालवताना क्लचवर सतत पाय ठेवणे. यामुळे ‘क्लच प्लेट’ आणि ‘प्रेशर प्लेट’ सतत घर्षणात राहतात, ज्यामुळे त्यांचा वेगाने घास होतो. दीर्घकाळ असेच केल्यास क्लच सिस्टम बदलण्याची वेळ येते, ज्याचा मोठा खर्च होऊ शकतो. क्लच फक्त गिअर बदलताना किंवा वाहन सुरू/थांबवताना दाबावा. बाकी वेळ पाय पूर्णपणे पेडलवरून दूर ठेवावा.
सिग्नलवरून सुरू करताना किंवा तुम्ही चढावर असताना काही जण अर्धा क्लच वापरतात. ही सवय वाहनाच्या क्लच प्लेटचे आयुष्य कमी करते. क्लच अर्धवट धरल्याने प्लेट गरम होते आणि त्याचे नुकसान होते. चढावर गाडी अडवण्यासाठी क्लचऐवजी हॅन्डब्रेकचा वापर करावा. यामुळे कार अधिक स्मूद चालते आणि मेंटेनन्स खर्च कमी होतो.
मॅन्युअल कार चालवताना वेगानुसार योग्य गिअर न लावल्यास इंजिनवर ताण वाढतो. कमी वेगात मोठा गिअर किंवा जास्त वेगात छोटा गिअर लावल्यास मायलेज कमी होते, इंजिनला झटका बसतो आणि गाडी स्मूद चालत नाही. वाहनाच्या युजर मॅन्युअलमध्ये प्रत्येक गिअरसाठी योग्य स्पीड दिलेला असतो. तो पाळल्यास कारची कार्यक्षमता वाढते.
सिग्नलवर किंवा ट्रॅफिकमध्ये बरेच चालक गिअर न्यूट्रल न करता क्लच दाबून ठेवतात किंवा कार ब्रेकवर धरून ठेवतात. हा सवय गिअरबॉक्स, क्लच आणि ब्रेक पॅड्सवर जादा भार टाकते. सिग्नल 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ असेल तर गिअर न्यूट्रल करणे आणि हॅन्डब्रेक लावणे हा उत्तम पर्याय आहे.
अचानक ब्रेक लावणे, अचानक गिअर बदलणे किंवा चुकीच्या पद्धतीने शिफ्टिंग करणे या सवयी मॅन्युअल कारसाठी घातक ठरतात. बारीकसारीक झटके बसल्याने गाडीची सस्पेन्शन सिस्टम, टायर आणि ब्रेकचे आयुष्य कमी होते. गाडी नेहमी हळूवार आणि नियंत्रित पद्धतीने चालवावी.