
मुंबई : अचानक उद्भवणाऱ्या आजारांवर आणि उपचारांच्या वाढत्या खर्चावर 'हेल्थ इन्शुरन्स' हा मोठा आधार असतो. यातून चांगला टॅक्सही वाचतो. पण, पॉलिसी वेळेवर रिन्यू करायला विसरलात, तर मात्र मोठी अडचण होऊ शकते. मुदत संपण्यापूर्वी पॉलिसी रिन्यू केली नाही, तर ती लॅप्स होते. यामुळे आतापर्यंत मिळालेले फायदे आणि 'वेटिंग पिरियड'मध्ये मिळालेली सूटही रद्द होऊ शकते.
अनेक इन्शुरन्स कंपन्या १५ ते ३० दिवसांचा 'ग्रेस पिरियड' देतात. पण या वेळेतही पॉलिसी रिन्यू केली नाही, तर आधीपासून आजार असलेल्या लोकांसाठी हा मोठा धोका ठरू शकतो. यामुळे तुमच्याकडे कोणतंही सुरक्षा कवच उरत नाही.
तारीख लक्षात ठेवा - पॉलिसी संपण्याची तारीख आधीच लिहून ठेवा. शेवटची तारीख चुकलीच, तर ग्रेस पिरियडचा वापर करा.
बदल तपासा - वय वाढतं तसं, कुटुंबात नवीन सदस्य आल्यावर किंवा एखादा नवीन आजार डिटेक्ट झाल्यावर कव्हरेजमध्ये बदल करा. गरजेनुसार एक्स्ट्रा कव्हरेज किंवा रायडर्स नक्की जोडा.
विम्याची रक्कम वाढवा - उपचारांचा खर्च झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे वेळेनुसार इन्शुरन्सची रक्कम वाढवण्यावर भर द्या. मोठी रक्कम वाढवताना काही वेळा मेडिकल टेस्टची गरज भासू शकते.
नवीन नियम तपासा - पॉलिसी रिन्यू करण्यापूर्वी एक्सक्लूजन (वगळलेल्या गोष्टी), कव्हरेजचे नियम आणि प्रीमियमच्या रकमेतील बदल तपासून पाहा. IRDAI च्या नियमांनुसार, पॉलिसीच्या रचनेत काही बदल असल्यास कंपन्यांनी ९० दिवस आधी ग्राहकांना कळवणं बंधनकारक आहे.
कागदपत्रे जपा आणि कुटुंबाला सांगा - प्रीमियम भरल्याची डिजिटल किंवा प्रिंटेड पावती सुरक्षित ठेवा. आणीबाणीच्या वेळी क्लेम लवकर मिळवण्यासाठी पॉलिसीची आणि रिन्यूअलची माहिती कुटुंबातील सदस्यांना नक्की द्या.